स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नाही; नदी ओलांडून अंत्यसंस्काराची वेळ
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल
स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नाही; नदी ओलांडून अंत्यसंस्काराची वेळ
सुरगाणा तालुक्यातील गोंदुणे ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या चिंचला येथे स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चिंचला येथील झिनू सुकर पालवा (६१) यांचे निधन झाले होते. यावेळी अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन जाताना नदी ओलांडून स्मशानभूमीकडे जावे लागत असल्याने नातेवाईक व ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पावसाळ्यात नदीला पाणी वाढल्यास परिस्थिती अधिक गंभीर बनते. अशा वेळी मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेणे अत्यंत जिकिरीचे ठरत असून, अंत्यसंस्काराच्या वेळीही ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून नदी पार करावी लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
चिंचला परिसरातील नागरिकांनी स्मशानभूमीकडे जाण्यासाठी तातडीने रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. अनेक वर्षांपासून या समस्येकडे प्रशासन व ग्रामपंचायतीने लक्ष द्यावे, अशी मागणी होत असतानाही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने पाहणी करून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


