# दोन वर्षांपासून धुळखात जांभूळपाडा उपकेंद्र; उपचारांसाठी नागरिकांची फरफट, आंदोलनाचा इशारा – आवाज जनतेचा
आरोग्य व शिक्षण

दोन वर्षांपासून धुळखात जांभूळपाडा उपकेंद्र; उपचारांसाठी नागरिकांची फरफट, आंदोलनाचा इशारा

 

ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने उभारण्यात आलेले मनखेड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जांभूळपाडा (दा.) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र गेल्या दोन वर्षांपासून पूर्ण होऊनही सुरू झालेले नाही. लाखो रुपयांचा निधी खर्चून उभारलेली इमारत आजही वापराअभावी धुळखात पडली असून, उपचारांसाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.

माहितीनुसार, उपकेंद्राचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही आवश्यक वैद्यकीय साहित्य, कर्मचारी नियुक्ती तसेच वीज व पाणी सुविधा उपलब्ध न झाल्याने हे केंद्र अद्याप कार्यान्वित झालेले नाही. परिणामी परिसरातील नागरिकांना किरकोळ आजारांसाठीही मनखेड किंवा इतर ठिकाणी जावे लागत असून त्यांचा वेळ आणि पैशाचा मोठा अपव्यय होत आहे. विशेषतः गर्भवती महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे.

स्थानिक नागरिकांनी अनेकवेळा प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. आरोग्य विभागाकडून “लवकरच उपकेंद्र सुरू करण्यात येईल” असे आश्वासन वारंवार दिले जात असले तरी प्रत्यक्षात कोणतीही हालचाल दिसून येत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, प्रशासनाने तातडीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून उपकेंद्र सुरू करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

प्रतिक्रिया : मुरलीधर पवार (स्थानिक ग्रामस्थ, जांभूळपाडा दा.)
“आमच्या सुरगाणा तालुक्याला कोणीच वाली नाही. आमदारांचे लक्ष कळवण तालुक्याकडे अधिक असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. गेली दोन वर्षे उपकेंद्राची इमारत केवळ शोभेची वस्तू बनली आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तातडीने उपकेंद्र सुरू करावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल.”

प्रतिक्रिया : सौ. अनुसया पाडवी (महिला बचत गट सीआरपी, जांभूळपाडा दा.)
“उपकेंद्र बंद असल्यामुळे सर्वाधिक त्रास महिलांना सहन करावा लागतो. प्रसूतीसाठी मनखेडला जावे लागते, मात्र तेथूनही अनेकदा तपासणी न करताच नाशिकला पाठवले जाते. त्यामुळे आर्थिक व मानसिक त्रास वाढतो. जांभूळपाडा उपकेंद्र तातडीने सुरू करून सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.”

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!