थेंबासाठी वणवण! मनखेडकरांची वांजुळपाड्याकडे पाण्यासाठी धाव
थेंबासाठी वणवण! मनखेडकरांची वांजुळपाड्याकडे पाण्यासाठी धाव
सुरगाणा तालुक्यातील मनखेड गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. गावातील विहिरी व इतर जलस्रोत आटल्याने ग्रामस्थांना अनेक किलोमीटर अंतरावरील वांजुळपाडा येथून पाणी आणण्याची वेळ आली आहे.
महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलेही डोक्यावर व हातगाड्यांमधून पाण्याचे हंडे वाहून नेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. उन्हाळ्याच्या तीव्र झळांमध्ये पाण्यासाठी होणारी ही वणवण ग्रामस्थांच्या हालअपेष्टा वाढवणारी ठरत आहे.
गावातील नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. तसेच कायमस्वरूपी उपाययोजना करून मनखेड गावाची पाणीटंचाई दूर करावी, अशी मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
पाणी हा मूलभूत अधिकार असताना मनखेडकरांना आजही पाण्याच्या एका थेंबासाठी संघर्ष करावा लागत असल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गावातील बिकट परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित विभागाने तातडीने दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे.



