
सालभोये आश्रम शाळेतील १० वीचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न
शासकीय आश्रम शाळा सालभोये येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साही व भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती तसेच बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे अधीक्षक भाऊसाहेब चेके उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी. एच. बागुल होते. यावेळी इतर विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुणे भाऊसाहेब चेके यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर मर्यादित ठेवत अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे सांगितले. त्यांनी व्हॉट्सअॅप व इन्स्टाग्रामसारख्या माध्यमांपासून दूर राहून ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. मुख्याध्यापक पी. एच. बागुल यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अभ्यासाचे नियोजन कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी काही विद्यार्थ्यांनी शालेय आठवणींना उजाळा देत भावनिक मनोगते व्यक्त केली. निरोप समारंभाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांकडून शाळेला आद्यक्रांतिकारकांचा फोटो व समई भेट देण्यात आली.
कार्यक्रमास शिक्षक बी. डी. भोये, पी. एस. गवळी, योगेश चव्हाण, जी. एच. भोये, एस. वाय. गायकवाड, एन. आर. खबाईत, भगवान वाघमारे, एम. आर. बहिरम, सुरेखा देशमुख, योगिता भोये, स्टाफ नर्स एम. बी. बनसोडे तसेच वर्ग ४ कर्मचारी आर. आर. भोये, डी. के. भोये, वसंत खांडवी, लक्ष्मण पाडवी आणि भारतीबाई पवार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी सुरज वाघमारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन बी. डी. भोये यांनी मानले.



