बोरगाव-अभोणा रस्त्यावर सुकापूर येथे रस्ता हरवला! खड्डे, चिखल आणि दुरवस्थेमुळे वाहनचालक त्रस्त; तातडीने दुरुस्तीची मागणी
बोरगाव-अभोणा रस्त्यावर सुकापूर येथे रस्ता हरवला!
खड्डे, चिखल आणि दुरवस्थेमुळे वाहनचालक त्रस्त; तातडीने दुरुस्तीची मागणी
बोरगाव : प्रतिनिधी लक्ष्मण बागुल
बोरगाव-अभोणा रस्त्यावरील सुकापूर परिसरात रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, रस्ता आहे की खड्ड्यांचा पट्टा, असा प्रश्न वाहनचालक व नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
पावसामुळे रस्त्याची अवस्था आणखी बिकट झाली असून काही ठिकाणी चिखल व खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावला आहे. दुचाकीस्वार तसेच एसटी व इतर वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी या मार्गावर अपघाताचा धोका अधिक वाढला आहे.
बोरगाव-अभोणा हा परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा मार्ग असून, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे दैनंदिन प्रवासावर परिणाम होत आहे. संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने सुकापूर येथील रस्त्याची तातडीने पाहणी करून खड्डे बुजवावेत व आवश्यक ती डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


