आदिवासी अल्पवयीन मुलीची विक्री करणाऱ्या १० जणांना अटक
संगमनेरमध्ये लावला बालविवाह; हरसूल पोलिसांची कारवाई

आदिवासी अल्पवयीन मुलीची विक्री करणाऱ्या १० जणांना अटक
संगमनेरमध्ये लावला बालविवाह; हरसूल पोलिसांची कारवाई
नाशिक ग्रामीण पोलिस दलाने ‘ऑपरेशन शोध- आयव्ही’ अंतर्गत हरसूल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका आदिवासी गावातील १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची विक्री करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील १० आरोपींना अटक केली. यात विवाह करणाऱ्या नवरदेवासह दोन महिलांचाही समावेश आहे.
हरसूल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दुर्गम आदिवासी भागातील १६ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली होती. या मुलीला आई नसून, तिच्या वडिलांनी हरसूल पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. परिसरातून कोणताही तरुण बेपत्ता नसल्याने पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. पोलिस अधीक्षक डॉ. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास चक्रे फिरवली. तपासादरम्यान पोलिसांना या मुलीचा शोध लावला. यासह मुलींची विक्री करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. आरोपींनी संगनमत करत पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही तिला मोबाइल आणि नवीन कपडे घेऊन दिले. त्यानंतर विवाहाचे आमिष दाखवून तिला वडिलांच्या ताब्यातून पळवून नेले. मुख्य आरोपी तुषार पचपिंड याच्याशी संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर येथे तिचा बालविवाह लावून दिला. या विवाहासाठी दोन्ही बाजूंच्या दलालांनी मध्यस्थी केली. मुलगी मिळवून देण्यासाठी दोन लाख रुपयांची दलाली ठरली होती. ही रक्कम काही रोख स्वरुपात तर काही ‘फोन पे’ द्वारे दलालांना वर्ग करण्यात आली होती. विवाह झाल्यापासून मुख्य आरोपी पीडितेवर अत्याचार करत होता.
अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये तुषार पाटीलबा पचपिंड (२९), विशाल नारायण परचंडे (३३), महादेव साहेबराव नाईकवाडे, संदीप पाटीलबा पचपिंड (४०, चाैघेही रा. कौठे मलकापूर, संगमनेर), सुरेश नवसू फसाळे (४६) कमल सुरेश फसाळे (३५) धर्मा नवसू फसाळे (४०, तिघेही रा. गंगाम्हाळुंगी, जि. नाशिक), सोन्याबापू बाळकृष्ण पाटोळे (४५, रा. वरवंडी, ता. संगमनेर), सिता पुंडलिक बेंडकोळी (३८, रा. वेळे, ता. त्र्यंबकेश्वर), ठकुबाई लक्ष्मण माळेकर (६०, रा. सारस्ते, ता. पेठ) यांना अटक करण्यात आली. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक डॉ. स्वामी, अप्पर पोलिस अधीक्षक विमला एम, उपविभागीय पोलिस अधिकारी वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली हरसूलचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन बोरसे, उप निरीक्षक सुनील आहेर, अनिल गांगुर्डे, सुनील ठाकरे, नामदेव गांगुर्डे, हेमराज गवळी, भारत खाडे, गिरीधर खोडे, तुकाराम भोये, युवराज चव्हाण, आशिष भुसारे, निर्मला भिवसन आणि जयश्री खेडुळकर यांच्या पथकाने तपास केला.

