
*धरण उशाशी अन् कोरड घशाशी! केळझर धरणाच्या पायथ्याशी असलेल्या करंजखेडमध्ये पाण्यासाठी वणवण*
*घाणीचे साम्राज्य: पाण्याच्या टाकीत चिखल अन् किडे;*
‘धरण उशाशी आणि कोरड घशाशी’ अशी म्हण सार्थ ठरणारी अत्यंत दयनीय अवस्था बागलाण तालुक्यातील केळझर धरणाच्या पायथ्याशी असलेल्या करंजखेड गावाची झाली आहे. गावाला लागूनच पाण्याचा मोठा स्रोत असतानाही, येथील महिलांना पाण्यासाठी १ ते १.५ किलोमीटर पायपीट करावी लागत आहे.
प्रशासन आणि ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे जनतेला चक्क ‘किडे’ पडलेले घाण पाणी प्यावे लागत असल्याने संतापाची लाट उसळली आहे.
*पाण्याच्या टाकीत चिखल आणि किड्यांचे राज्य*
गावाला पाणीपुरवठा करणारी टाकी तब्बल ४० ते ४५ वर्षे जुनी आहे. या पाण्याची टाकीचा सल्याब पूर्ण जीर्ण झाला आहे. या टाकीची गेल्या अनेक वर्षांपासून साधी साफसफाईही करण्यात आलेली नाही. ग्रामस्थांनी प्रत्यक्ष जाऊन पाहिले असता, टाकीमध्ये १ ते १.५ फूट चिखल साचला असून त्यात चक्क किडे तरंगत असल्याचे भयावह दृश्य समोर आले आहे. हेच दूषित पाणी नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असून, साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.
*सरपंच-ग्रामसेवकांची मनमानी: जनता वाऱ्यावर*
या गंभीर प्रश्नाबाबत जेव्हा संतप्त ग्रामस्थांनी सरपंच आणि ग्रामसेवक यांना जाब विचारला, तेव्हा त्यांनी प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेली. “सरपंच आणि ग्रामसेवक यांची मनमानी चावट्यावर, पण जनता मात्र वाऱ्यावर” अशी परिस्थिती सध्या गावात पाहायला मिळत आहे. ग्रामपंचायत सदस्यांनीही या मूलभूत प्रश्नाकडे पाठ फिरवल्याने दाद मागायची कोणाकडे? असा प्रश्न करंजखेडची जनता विचारत आहे.
*जीर्ण टाकी कधीही कोसळण्याची भीती*
पाण्याची टाकी अत्यंत जीर्ण अवस्थेत पोहोचली आहे. टाकीचा स्लॅब वारंवार कोसळत असून आतील लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. ही टाकी कोणत्याही क्षणी कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असूनही ग्रामपंचायत प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याने, “प्रशासन एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का?” असा संतप्त सवाल जनता विचारत आहे.
*महिलांची पाण्यासाठी पायपीट*
धरण जवळ असूनही नळाला पाणी येत नाही किंवा आले तर ते अत्यंत घाण असते. त्यामुळे घराघरातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी मैलोन्मैल भटकंती करावी लागत आहे. आदिवासी पट्ट्यातील या महिलांचे हाल थांबायला तयार नाहीत. गावच्या विकासाचा दावा करणाऱ्या ग्रामपंचायतीला पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा प्रश्नही सोडवता येत नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
*उडवाउडवीची उत्तरे:* जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्यास टाळाटाळ.
आता तरी जिल्हा प्रशासन लक्ष देणार का?
एकीकडे शाळा नाही आणि दुसरीकडे पिण्याचे शुद्ध पाणी नाही, अशा दुहेरी संकटात करंजखेड गाव सापडले आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या सरपंच व ग्रामसेवकांवर वरिष्ठ पातळीवरून कारवाई होणार का? आणि या गावाला शुद्ध पाणी मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



