आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत ‘संपूर्णता अभियान–2.0’चा सुरगाणा येथे शुभारंभ
केंद्र शासनाच्या नीती आयोग मार्फत राबविण्यात येणाऱ्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत ‘संपूर्णता अभियान–2.0’चा उद्घाटन सोहळा दि. 13 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता पंचायत समिती कार्यालय, सुरगाणा येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रम मा. आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी, नाशिक) व ओमकार पवार (मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नाशिक) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. नितीन अर्जुन पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
दि. 28 जानेवारी ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा मुख्य उद्देश आरोग्य व पोषण, शिक्षण तसेच कृषी व पशुसंवर्धन या क्षेत्रांतील निश्चित करण्यात आलेल्या सहा निर्देशांकांची शंभर टक्के पूर्तता साध्य करणे हा आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू व पुस्तक देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. गटविकास अधिकारी जगन सूर्यवंशी यांनी अभियानाची भूमिका व उद्दिष्टे स्पष्ट केली. त्यानंतर महिला व बाल विकास, आरोग्य, शिक्षण, उमेद, पशुसंवर्धन आणि कृषी विभागांकडून संबंधित निर्देशांकांवर सादरीकरण करण्यात आले.
यावेळी मा. आमदार नितीन अर्जुन पवार तसेच मा. कश्मिरा संखे (भा.प्र.से.) यांनी सर्व विभागांनी निर्देशांकांवर लक्ष केंद्रीत करून सुरगाणा तालुका आकांक्षित यादीतून लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या. शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी समन्वयाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यानंतर मान्यवरांच्या हस्ते ‘संपूर्णता अभियान–2.0’ पुस्तिकेचे अनावरण करून अभियानाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. आयसीडीएस विभागामार्फत बेबी किटचे प्रातिनिधिक वितरण करण्यात आले. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मुदतीत घरकुल पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. आरोग्य विभागाकडून माता-बाल आरोग्य, पोषण व स्वच्छतेबाबत उपस्थितांना प्रतिज्ञा देण्यात आली.
कार्यक्रमास तहसीलदार रामजी राठोड, सहा. गटविकास अधिकारी बाळासाहेब खेडकर, एबीपी फेलो मंगेश निकम, महिला व बाल विकास विभागाचे संजय कोंडार, आरोग्य विभागाचे डॉ. दिलीप रणवीर, शिक्षण विभागाच्या अल्पा देशमुख, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. सुभाष हिंगे व डॉ. नरेंद्र भागवत, कृषी विभागाचे किशोर अहिरे व अशोक गावित, उमेद विभागाचे कुणाल जाधव व गणेश महाले, विस्तार अधिकारी रामचंद्र झिरवाळ व माधव गावित यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बचत गट प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचा समारोप रामचंद्र झिरवाळ यांनी आभार प्रदर्शनाने केला.
या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.