पंधरा वर्षांपासूनच्या अनैतिक संबंधातून निफाड येथील एका ६० वर्षीय महिलेचा नायलॉनच्या दोरीने गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीने मृतदेहासह दगडाने भरलेले पोते घराजवळील विहिरीत टाकून दिले होते. एक महिन्यानंतर या महिलेचा मृतदेह विहिरीत सापडला. रंभाबाई काळे (६०, रा. अहिल्यानगर, निफाड) असे मृत महिलेचे नाव असून त्या २४ फेब्रुवारीपासून बेपत्ता होत्या. त्या निफाडच्या खासगी रुग्णालयात काम करत होत्या. रंभाबाई बेपत्ता असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी मोबाइल लोकेशनच्या आधारे निफाड येथील अरुण बाजीराव ढेपले (४५) याला चौकशीसाठी बोलावले. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसी खाक्या दाखवताच ढेपले याने गुन्हा कबूल केला. त्याने दिलेल्या कबुलीनुसार, रंभाबाई त्याच्याशी विवाह करण्याचा हट्ट करत होती. यामुळे त्याने रंभाबाईचा दोरीने गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह दगडासह पोत्यात भरत ते पोते घराजवळील विहिरीत टाकले. दरम्यान, संशयित अरुण ढेपले याने गुन्हा कबूल केल्यानंतर विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला निफाडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरीकडे, बेपत्ता रंभाबाई यांचा शोध घेण्यासाठी पोलिस उपअधीक्षक कांतीलाल पाटील यांच्यासह पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांनी पोहणाऱ्या टीमच्या मदतीने शनिवारी व रविवारी विहिरीत शोध घेत मृतदेहासह दगडाने भरलेले पोते बाहेर काढले. एक महिना विहिरीत राहिल्याने मृतदेह खराब झाला होता. या घटनेमुळे निफाड तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक गणेश गुरव तपास करत आहे.
या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.