सुरगाणाहून नाशिककडे जाणारी बस उंड ओहोळ फाट्यावर पेटली; २७ प्रवासी सुखरूप
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

सुरगाणाहून नाशिककडे जाणारी बस उंड ओहोळ फाट्यावर पेटली; २७ प्रवासी सुखरूप
सुरगाणाहून नाशिककडे जाणारी राज्य परिवहन मंडळाची बस सायंकाळी सहा वाजे दरम्यान सुरगाणा तालुक्यातील उंड ओहोळ फाटा येथे अचानक पेट घेतल्याची घटना घडली. ही घटना चालकाच्या वेळीच लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली.
बसला आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने तत्परता दाखवत बस रस्त्याच्या कडेला उभी केली आणि बसमधील सर्व २७ प्रवाशांना तात्काळ खाली उतरवले. त्यामुळे सर्व प्रवासी सुखरूप बचावले.
दरम्यान, आगीची तीव्रता वाढू नये म्हणून परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतातील मोटारची पाईप घेऊन पाण्याचा मारा करण्यात आला. त्यामुळे आग आटोक्यात येऊन मोठे विघ्न टळले.
या प्रसंगी कांतीलाल भोये, नंदू महाले, हरी भोये, प्रकाश महाले, सुरेश गायकवाड, जयेश पवार आणि भरत महाले यांनी धाडसाने पुढाकार घेत परिश्रम घेतले. त्यांच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.या घटनेचे नेमके कारण समजू शकले नसून पुढील तपास सुरू आहे.
सुरगाणा तालुक्यात येणाऱ्या बस या नेहमी नादुरुस्त होत असतात. त्यामुळे तालुक्यात येणाऱ्या बस चांगल्या द्या अशी मागणी जोर धरू लागली आहे.



