
सायंकाळी उंबरठाण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के
सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण परिसरातील अनेक गावांमध्ये गुरुवारी सायंकाळी सुमारे ७ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास दोन वेळा सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. या अचानक बसलेल्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
उंबरठाण परिसरातील निंबरपाडा, दातरीचापाडा, कोठुळा, श्रीरामपूर, देवलदारी, पांगारणे, करंजूल सु ,कृष्णनगर, काठीपाडा गुही, जामूनपाडा आदी गावांमध्ये हे धक्के स्पष्टपणे जाणवले. नागरिकांनी घराबाहेर येत सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. काही ठिकाणी घरातील वस्तू हलल्याचेही सांगण्यात आले.
दरम्यान, या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



