गिरणा नदीत दत्तनगर शिवारात अवैध वाळू उपसा सुरूच वाळू माफिया जोमात, प्रशासन कोमात; शेतकऱ्यांचे ठिबक बंद, गुरेही पाणी पीत नाही.

गिरणा नदीत दत्तनगर शिवारात अवैध वाळू उपसा सुरूच
वाळू माफिया जोमात, प्रशासन कोमात; शेतकऱ्यांचे ठिबक बंद, गुरेही पाणी पीत नाही.
कळवण तालुक्यातील चनकापूर येथील गिरणा नदी पात्रात दत्तनगर शिवारात भरदिवसा सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे वाळू माफियांचा सुळसुळाट वाढला असून संबंधित प्रशासन मात्र गप्प बसले असल्याचे चित्र आहे. प्रशासनाच्या अभयामुळे बिनधास्तपणे क्रेनच्या सहाय्याने वाळू उपसा सुरू असून, याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष होत आहे का? असा सवाल ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
दत्तनगर, जयपूर शिवारासह नदीकाठालगत मोठ्या प्रमाणावर शेती असून अनेक शेतकऱ्यांनी गिरणा नदीवर विद्युत पंप बसवले आहेत. सध्या कांदा लागवडीचा हंगाम सुरू असून टोमॅटो, मिरची आदी भाजीपाला पिकांसाठी आधुनिक ठिबक सिंचनाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. मात्र, अवैध वाळू उपशामुळे नदीचे पाणी प्रचंड गढूळ झाले असून या गढूळ पाण्यामुळे ठिबक सिंचनाच्या नळ्या चोकअप होत आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे ठिबक पूर्णपणे बंद पडत असून पिकांना पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.
याचबरोबर अनेक शेतकरी गुरांना पाणी पाजण्यासाठी नदी पात्रात आणतात. मात्र गढूळ पाण्यामुळे गुरे पाणीही पीत नसल्याने पशुधनाच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व बाबींमुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना वाळू माफियांच्या कारवायांमुळे मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
खुलेआम सुरू असलेल्या या अवैध धंद्यावर कारवाई होत नसल्याने वाळू माफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. संबंधित महसूल, पोलिस व पर्यावरण विभाग यांच्यावर कोणाचा वरदहस्त आहे का, असा संशय नागरिक व्यक्त करत आहेत. प्रशासन यावर कठोर कारवाई करणार की बघ्याची भूमिका घेणार, हे पाहणे आता तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. अन्यथा अवैध वाळू उपसा असेच रामभरोसे सुरू राहणार का, याचे उत्तर लवकरच स्पष्ट होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.



