उंबरठाणला गोवंश जातीची ६ जनावरे जप्त, २१ वर्षीय तरुणाची दिंडोरी न्यायालयाकडून जामिनावर मुक्तता

उंबरठाणला गोवंश जातीची ६ जनावरे जप्त
२१ वर्षीय तरुणाची दिंडोरी न्यायालयाकडून जामिनावर मुक्तता
सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण शिवारात जंगलात गोवंशावर अमानुष अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. चारा व पाणी न देता आखूड दोराने बांधलेल्या अवस्थेत ५ गायी व एका गोऱ्ह्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी अरमान हुसेन शेख (२१, रा. उंबरठाण) यास अटक करण्यात आली. पोलिसांनी संशयित आरोपीस दिंडोरी न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली.
सोमवारी (दि. १२) दुपारी साडेचारला उंबरठाणच्या जंगलात गोवंश बांधून ठेवण्यात आल्याची माहिती मिळताच सुरगाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. झाडाझुडपात दोरखंडाने बांधलेली जनावरे आढळली. आरोपीने गोवंश जातीच्या जनावरांना चारा व पाण्यापासून वंचित ठेवल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी जप्त केलेल्या जनावरांत १० वर्षाच्या ३ गायी (किंमत प्रत्येकी १२ हजार रुपये), ५ वर्ष वयाच्या २ गायी (किंमत प्रत्येकी ८ हजार रुपये) व ५ वर्ष वयाचा एक गोऱ्हा (किंमत ८ हजार रुपये) यांचा समावेश आहे. यांची एकूण किंमत ६० हजार रुपये आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. गोवंश संरक्षण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीची मागणी होत आहे. याप्रकरणी सुरगाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक खाडे, उपनिरीक्षक मनोज कुवर, पोलिस हवालदार दिलीप वाघ, गणेश आव्हाड या पथकाने कारवाई केली.
—



