नागझरी फाट्यावरील पूल रखडला; वाहनचालक हैराण, आंदोलनाचा इशारा! तीन महिन्यांपासून काम ठप्प; जूनपर्यंत पूर्ण न झाल्यास वणी–सापुतारा मार्ग बंद होण्याची शक्यता

नागझरी फाट्यावरील पूल रखडला; वाहनचालक हैराण, आंदोलनाचा इशारा!
तीन महिन्यांपासून काम ठप्प; जूनपर्यंत पूर्ण न झाल्यास वणी–सापुतारा मार्ग बंद होण्याची शक्यता
वणी–सापुतारा राष्ट्रीय महामार्गावरील नागझरी फाटा येथे पूर्वी असलेला पूल तोडून नवीन पूल उभारणीचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून हे काम पूर्णपणे ठप्प असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
सध्या या मार्गावरून प्रवास करताना पर्यायी व्यवस्था नसल्याने नागरिकांना धोकादायक वळणे, कच्चे रस्ते आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पावसाळा तोंडावर येत असताना ही परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिकांच्या मते, जर जून महिन्यापर्यंत पुलाचे काम पूर्ण झाले नाही, तर वणी–सापुतारा तसेच सुरगाणा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे प्रवासी, विद्यार्थी, शेतकरी व व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
दरम्यान, या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन काम जलदगतीने पूर्ण करावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा सुरगाणा तालुका काँग्रेस अध्यक्ष सखाराम भोये यांनी दिला आहे.
स्थानिक नागरिकांनीही लवकरात लवकर पुलाचे काम पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी केली आहे.


