स्वदेस फाउंडेशन चा मदतीचा हात; बोरीची बारीत ‘झिंक टाकी’मुळे जलोत्सव
१२ लाख लिटर क्षमतेच्या साठवणुकीने १०७ घरांची तहान भागणार
पेठ तालुक्यातील कुंभाळे ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बोरीची बारी या गावाला अनेक वर्षांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. खडकाळ बेसॉल्ट जमिनीमुळे भूजल साठा होत नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत होते. महिलांना रात्रीपासून विहिरीवर रांगा लावून जीव धोक्यात घालून पाणी काढावे लागत होते. या पार्श्वभूमीवर Swades Foundationच्या पुढाकारातून गावात १२ लाख लिटर क्षमतेची ‘झिंक टाकी’ उभारण्यात आली असून १०७ घरांना नळाद्वारे शुद्ध पाणी पुरवठा सुरू झाला आहे.
संस्थापक रॉनी स्क्रूवाला आणि झरीना स्क्रूवाला यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे यांच्या नेतृत्वाखाली गाव विकास समितीच्या सहकार्याने हे काम पूर्णत्वास गेले. सुरुवातीला नळयोजना राबविण्यात आली; मात्र उन्हाळ्यात टंचाई कायम राहिल्याने दीर्घकालीन उपाय म्हणून झिंक टाकी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
असा होतो उपयोग
‘झिंक टाकी’ ही पावसाचे पाणी साठविण्यासाठी उभारलेली रेन वॉटर हार्वेस्टिंग टाकी आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साठवून तेच पाणी उन्हाळ्यात वापरले जाते. गावाच्या गरजेनुसार साठवण क्षमतेचे नियोजन करण्यात आल्याने टंचाईच्या काळात घरगुती वापरासाठी आवश्यक पाण्याची पूर्तता शक्य होते.
सौरऊर्जेवर आधारित योजना
ही संपूर्ण पाणी योजना सौरऊर्जेवर कार्यान्वित असल्याने वीज खर्चात बचत होत आहे. पर्यावरणपूरक जलव्यवस्थेमुळे ग्रामस्थांना शाश्वत पाणीपुरवठा मिळाला असून गावात ‘जलोत्सव’चे वातावरण निर्माण झाले आहे.
दीर्घकाळाच्या प्रतीक्षेनंतर अखेर बोरीची बारी ग्रामस्थांची तहान भागली असून, स्वदेसच्या पुढाकाराचे सर्वत्र स्वागत होत आहे.
या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.