# शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी किसानसभेतर्फे बोरगावला रास्तारोको आंदोलन – आवाज जनतेचा
आपला जिल्हा

शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी किसानसभेतर्फे बोरगावला रास्तारोको आंदोलन

दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा जे. पी. गावित यांचा इशारा

शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी किसानसभेतर्फे बोरगावला रास्तारोको आंदोलन

दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा जे. पी. गावित यांचा इशारा

 

शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेतर्फे राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी (दि. १७) सुरगाणा तालुक्यातील वणी सापुतारा राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव येथे बिरसा मुंडा चौकात सुमारे दीड हजार आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले.
महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांच्या तहसील कार्यालयांसमोर होणाऱ्या या आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे माजी राज्याध्यक्ष तथा शेतकरी नेते, माजी आमदार जे. पी. गावित यांनी केले. शासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या आंदोलनात शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या. पश्चिम वाहिनी नद्यांच्या उपनद्यांवर के. टी वेअर सिमेंट काँक्रिटसारखे आदर्श बंधारे बांधून स्थानिक शेतकरी तसेच खान्देश व मराठवाड्यातील शेतकरी, उद्योगधंदे व औद्योगिक वसाहतींना पाणी उपलब्ध करून द्यावे, अपूर्ण व गाळाने भरलेले बंधारे त्वरित पूर्ण करावेत, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. वनाधिकार कायदा अंतर्गत आदिवासींच्या ताब्यात असलेली १० एकर हक्काची जमीन तत्काळ लाभधारकांना द्यावी, स्वतंत्र सातबारा तयार करून पती-पत्नीचे नाव कब्जेदार सदरी नोंदवावे, इतर हक्क सदरी वनविभाग अथवा शासनाचे नाव असावे, अशी मागणी करण्यात आली. वनपट्टा धारकांना मिळालेल्या जमिनीत विहीर, जमीन सपाटीकरण, फळबाग लागवड, सोलर व मोटर यासह केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांचा लाभ द्यावा, उर्वरित फॉरेस्ट प्लॉट प्रकरणे त्वरित निकाली काढावीत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा करावा या मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात जनार्दन भोये, सावळीराम पवार, वसंत बागुल, पुंडलिक भोये, संदीप भोये, अशोक भोये, भगवान गांगुर्डे, भास्कर जाधव, अशोक धूम, नितीन गावित सहभागी झाले होते. पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज कुंवर, उपनिरीक्षक खाडे व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

यापूर्वी तीन वेळा या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले होते मुंबईला दोन वेळा तर एक वेळा नाशिक येथे व बि-हाड मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी सरकारने दिलेली आश्वासने निसपळ झाल्याने हा आरपारचा मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यावेळी वाहतूक नागझरी फाटा – चिराई मार्गे हातगड येथे वळवण्यात आली आहे. नाशिक कडून सापुतारा येताना उंबरपाडा टोल नाका नागझरी फाटा येथून डावीकडे वळून घेऊन चिराई मार्गे हातगड सापुतारा जाता येणार आहे. यामुळे पाच ते सहा किलोमीटर अंतर वाढणार आहे.

तालुक्यात माझ्यासारखे अनेक फॉरेस्ट प्लॉट धारक आहेत.
गेल्या 38 वर्षांपासून कसत असलेल्या फॉरेस्ट प्लॉट च्या अडीच एकर जमिनीसाठी सरकारला पुरावे देऊनही अद्यापही सदरचा फॉरेस्ट प्लॉट माझ्या नावावर झालेला नाही. तो अपात्र झाल्याबाबतचे तीन नोटीस मला मिळाले आहेत तरीही जमिनीचा सातबारा माझ्या नावाने मिळावा यासाठी मी या आंदोलनात सहभागी झालो आहे.

_चंदर रामू वाघमारे, निंबारपाडा (खो)

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!