शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी किसानसभेतर्फे बोरगावला तिसरा दिवस असून रास्तारोको आंदोलन सुरुच

शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी किसानसभेतर्फे बोरगावला तिसरा दिवस असून रास्तारोको आंदोलन सुरुच
शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेतर्फे राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी (दि. १९) रोजी तिसरा दिवस असून सुरगाणा तालुक्यातील वणी सापुतारा राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव येथे बिरसा मुंडा चौकात बेमुदत रास्ता रोको आंदोलन सुरुच आहे.
महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांच्या तहसील कार्यालयांसमोर होणाऱ्या या आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे माजी राज्याध्यक्ष तथा शेतकरी नेते, माजी आमदार जे. पी. गावित यांनी केले. शासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या आंदोलनात शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या. पश्चिम वाहिनी नद्यांच्या उपनद्यांवर के. टी वेअर सिमेंट काँक्रिटसारखे आदर्श बंधारे बांधून स्थानिक शेतकरी तसेच खान्देश व मराठवाड्यातील शेतकरी, उद्योगधंदे व औद्योगिक वसाहतींना पाणी उपलब्ध करून द्यावे, अपूर्ण व गाळाने भरलेले बंधारे त्वरित पूर्ण करावेत, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. वनाधिकार कायदा अंतर्गत आदिवासींच्या ताब्यात असलेली १० एकर हक्काची जमीन तत्काळ लाभधारकांना द्यावी, स्वतंत्र सातबारा तयार करून पती-पत्नीचे नाव कब्जेदार सदरी नोंदवावे, इतर हक्क सदरी वनविभाग अथवा शासनाचे नाव असावे, अशी मागणी करण्यात आली. वनपट्टा धारकांना मिळालेल्या जमिनीत विहीर, जमीन सपाटीकरण, फळबाग लागवड, सोलर व मोटर यासह केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांचा लाभ द्यावा, उर्वरित फॉरेस्ट प्लॉट प्रकरणे त्वरित निकाली काढावीत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
यासह शेतकऱ्यांच्या सर्व पिकांना हमीभाव द्यावा, दोन हेक्टरपर्यंतच्या भात पिकासाठी आदिवासी विकास विभाग जसा चाळीस हजार रुपयांचा बोनस देतो, त्याचप्रमाणे वनपट्टा धारकांनाही बोनस द्यावा, पेसा क्षेत्रातील सर्व खात्यांमधील नोकरभरती त्वरित पूर्ण करावी, शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील कर्मचारी भरती करावी, जिल्हा परिषद शिक्षक भरती पूर्ण करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे, शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा करावा या मागण्या करण्यात आल्या. पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज कुंवर, उपनिरीक्षक खाडे व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.



