वृक्षतोड परवानगीसाठी लाच घेताना वनविभागाच्या सहा कर्मचाऱ्यांना अटक
दोन खासगी व्यक्तींवरही एसीबीची कारवाई

वृक्षतोड परवानगीसाठी लाच घेताना वनविभागाच्या सहा कर्मचाऱ्यांना अटक
दोन खासगी व्यक्तींवरही एसीबीची कारवाई
बोरगाव – लक्ष्मण बागूल
येवला येथील दहेगाव पाटोदा येथील साग वृक्षतोड परवानगी मंजूर करुन देण्यासाठी लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत सहा वन कर्मचारी आणि दोन खासगी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचाराचा आणखी एक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी सरकारतर्फे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक पूनम केकर यांनी फिर्याद दिली आहे. तक्रारदाराने येवला तालुक्यातील शेतातील २ हेक्टर ४ आर क्षेत्रातील सागाची झाडे तोडण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. संबंधित शासकीय प्रक्रिया पूर्ण करत कायदेशीर परवानगी मिळण्याची अपेक्षा असताना हे काम मंजूर करून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून खासगी व्यक्तींच्या माध्यमातून पैशांची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपींत भाऊसाहेब पंढरीनाथ माळी (वनपाल), पंकज राजेंद्र नागपुरे (वनरक्षक), प्रवीण बाळासाहेब भोसले (कनिष्ठ लिपिक), आकाश नामदेव कोळी (कार्यालयीन वनरक्षक), विजय शिवाजी लोंढे (वनमजूर), रामनाथ लक्ष्मण भोरकडे (वनमजूर) यांच्यासह निखिल सुनील आरणे (डेटा ऑपरेटर) आणि सुनील भगवान भुरुक (खासगी चालक) यांनाही आरोपी करण्यात आले आहे. तक्रारदाराकडून सुरुवातीला १९ हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. एसीबीने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर तडजोडीअंती ११ हजार ५०० रुपये स्वीकारण्याचे निश्चित झाल्याचे स्पष्ट झाले. त्यात ५०० रुपयांच्या २३ नोटांचा समावेश होता. संबंधितांनी स्वतःसाठी तसेच इतरांना वाटप करण्यासाठी ही रक्कम मागितल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीने नियोजनबद्ध सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतिमा आबूज, हवालदार प्रल्हाद खांडवी, किरण धुळे, प्रभाकर गवळी, गणेश निंबाळकर, नितीन नेरोळे यांनी सहभाग घेतला. पोलिस निरीक्षक प्रतिमा आबूज या पुढील तपास करत आहे.

