गुजरात सीमेवर खैर लाकडांची तस्करी उधळली; स्कॉर्पिओ वाहन जप्त
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

गुजरात सीमेवर खैर लाकडांची तस्करी उधळली; स्कॉर्पिओ वाहन जप्त
महाराष्ट्र-गुजरात सीमेलगत खैर लाकडांची अवैध तस्करी करणाऱ्या टोळीवर वनविकास महामंडळाच्या पथकाने धडक कारवाई करत तस्करीचा प्रयत्न उधळून लावला. पेठ-हरसूल वनपरिक्षेत्रातील रायते जंगल परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत खैर लाकडांसह स्कॉर्पिओ वाहन जप्त करण्यात आले. मात्र, वनपथकाची चाहूल लागताच तस्करांनी अंधाराचा फायदा घेत जंगलाच्या दिशेने पळ काढला.
महाराष्ट्रातील ओझरखेड व गुजरातमधील सुलिया सीमेलगत वनपथकाने सापळा रचून ही कारवाई केली. संशयित स्कॉर्पिओ वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये खैर लाकडांचे सहा नग (०.०८७ घनमीटर) आढळून आले. वनविकास महामंडळाने ही वनउपज तसेच स्कॉर्पिओ वाहन ताब्यात घेत जप्त केले.
दरम्यान, तस्करीसाठी वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ विनानंबर प्लेट असल्याचेही तपासात समोर आले. संशय टाळण्यासाठी वाहनाची ओळख लपवून चोरट्या वाहतुकीसाठीच त्याचा वापर केला जात असल्याची चर्चा ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. सीमेलगतच्या जंगलात खैर तस्करीचे प्रकार वाढत असल्याने वनविभागाने या भागात गस्त व देखरेख अधिक कडक केली आहे.
या प्रकरणी पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील काही संशयित गुजरातमधील असल्याचे निष्पन्न झाले आहे. तस्करांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई वनविकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक उमेश वावरे, विभागीय व्यवस्थापक डॉ. सुजित नेवसे व सहायक व्यवस्थापक प्रवीण डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश वलैया, वनपाल संदीप रणमाळे, नीलेश पाटील तसेच चालक देवीदास बोंबले यांनी सहभाग घेतला.

