सुरगाण्यात खैराचे २० नग जप्त; गुजरातमधील तस्करास दिंडोरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी
सुरगाणा तालुक्यातील सुळे (वांगण) शिवारात बेकायदेशीर लाकूड वाहतुकीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून वनविभागाने केलेल्या कारवाईत गुजरातमधील एक तस्कर अटकेत घेतला आहे. बाऱ्हे वनपरिक्षेत्र अधिकारी व सहकाऱ्यांनी शनिवारी (दि. १) सकाळी सुमारे ७ वाजता सापळा रचला असता जंगलाकडून येणारी एक चारचाकी (क्रमांक जीजे २१ एम ९७१५) व दुचाकी (जीजे १५ डीसी ५७९८) संशयास्पदरीत्या आढळून आली.
चारचाकी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यातील दोघे संशयित वाहन सोडून जंगलात पळून गेले. मात्र दुचाकीस्वार वसंत काशीराम कहांडोळे (रा. मुरदड, ता. धरमपूर, जि. वलसाड) यास दुचाकीसह ताब्यात घेण्यात वनविभागाला यश आले.
चारचाकी वाहनाची तपासणी केली असता त्यात खैर प्रजातीच्या लाकडाचे २० नग आढळले. या लाकडाची अंदाजे किंमत ७ हजार ८४९ रुपये असून चारचाकी व दुचाकीसह एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे १ लाख १० हजार रुपये असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
ताब्यात घेतलेल्या संशयिताला रविवारी (दि. १) दिंडोरी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पश्चिम विभागाचे उपवनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बाऱ्हे वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर कुवर यांच्यासह वनरक्षक व कर्मचाऱ्यांनी केली.
या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.