तीन वर्षांपासून धूळखात पडलेली जलजीवन योजनेची टाकी कधी भागवणार तहान? जांभूळपाड्यात पाणी प्रश्न गंभीर; संतप्त ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

-
तीन वर्षांपासून धूळखात पडलेली जलजीवन योजनेची टाकी कधी भागवणार तहान?
जांभूळपाड्यात पाणी प्रश्न गंभीर; संतप्त ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारासुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम, आदिवासीबहुल रोंघाने ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या जांभूळपाडा (दा.) येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या योजनेचे काम गेली दोन ते तीन वर्षांपूर्वी पूर्ण झाले असतानाही अद्याप गावाला पाणी मिळालेले नाही. योजनेची पाण्याची टाकी उभी आहे; मात्र प्रत्यक्षात गावकऱ्यांची तहान अजूनही भागलेली नाही. “मग हे पाणी मुरतंय कुठे?” असा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहेत.
ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वारंवार तक्रारी करूनही सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत सदस्यांकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. सध्या ग्रामस्थांना एक ते दीड किलोमीटर अंतरावरून डोक्यावर हंडे घेऊन पायपीट करून पाणी आणावे लागत आहे, याचा सर्वाधिक फटका महिलांना बसत असून त्यांचे प्रचंड हाल होत आहेत.
या पाणीटंचाईचा सामाजिक परिणामही जाणवत असून, गावात घराघरांत वादविवादांचे प्रमाण वाढले आहे. तरुण युवकांनी ग्रामसभेत वारंवार हा मुद्दा उपस्थित केला; मात्र चर्चा झाली, पाणी मात्र आले नाही, अशी खंत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. संबंधित ठेकेदार नागरिकांकडे उडवाउडवीची व अरेरावीची उत्तरे देत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर ठेकेदारावर तातडीने कार्यवाही करून त्याला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच प्रशासन व लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष घालून येत्या आठवडाभरात पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा ग्रामपंचायतला टाळे ठोकण्याचा व आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.
स्थानिक महिलांनी आपल्या व्यथा मांडताना सांगितले, “डोक्यावर हंडा घेऊन रोज एक ते दीड किलोमीटर पायपीट करावी लागते. हा प्रश्न वेळोवेळी सांगूनही कुणीच ऐकत नाही.”
— वंदना भोये, स्थानिक महिला, जांभूळपाडा (दा.)
तर, “सरपंच, ग्रामसेवक यांना वारंवार सांगूनही दुर्लक्ष होते. ठेकेदार कुणाच जुमानत नाही. योग्य कार्यवाही झाली नाही तर टाळेबंदी आंदोलन करू,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
— महिंद्र पाडवी, स्थानिक ग्रामस्थ, जांभूळपाडा (दा.)
एकीकडे योजनेची कामे पूर्ण असल्याचा दावा, तर दुसरीकडे ग्रामस्थांच्या घामाचे पाणी—या भीषण वास्तवाकडे प्रशासन कधी जागे होणार? असा प्रश्न जांभूळपाडा आजही विचारत आहे.



