महाराष्ट्र–गुजरात सीमेवर खैर तस्करी उधळली वनविकासची पहाटे धडक; ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

महाराष्ट्र–गुजरात सीमेवर खैर तस्करी उधळली
वनविकासची पहाटे धडक; ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील महाराष्ट्र–गुजरात सीमारेषेवर अवैधरित्या खैर वृक्षतोड करून साठवून ठेवलेला मुद्देमाल वनविकासच्या पथकाने दि. १३ रोजी पहाटेच्या सुमारास धाड टाकून जप्त केला. हरसूल युनिट अंतर्गत रायता वनपरिक्षेत्रातील बाफनविहीर बिट परिसरात ही कारवाई करण्यात आली.
शुक्रवारी रात्रपाळी गस्तीदरम्यान विराचापाडा व खंडीचापाडा परिसरालगत कक्ष क्र. १३७ मधील राखीव वनक्षेत्राजवळ संशयास्पद हालचाली दिसून आल्या. अधिक चौकशी केली असता अज्ञात व्यक्तींनी खैर वृक्षांची अवैध तोड करून वनउपज साठवून ठेवल्याचे आढळले. घटनेची माहिती मिळताच रायता, बोरीपाडा व पेठ दक्षता पथकाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत अवैध साठा जप्त केला.
या कारवाईत खैराचे एकूण ७ नग, अंदाजे ०.५०६ घनमीटर लाकूड जप्त करण्यात आले असून सुमारे ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दरम्यान, अंधाराचा फायदा घेत काही संशयित आरोपी महाराष्ट्र–गुजरात सीमेच्या दिशेने फरार झाले. फरार आरोपींचा शोध सुरू असून वनविकास विभागाने तपासाची सूत्रे वेगाने हलविली आहेत. या प्रकरणी Indian Forest Act, 1927 च्या कलम ५२ (१) व ४१ (१) अन्वये वनगुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश बलैया यांच्या नेतृत्वाखाली वनपाल संदीप रणमले, पायल कोळी, वनरक्षक नीलेश पाटील, अमोल शेळके, रोहित पगार, दीपक डफळ व वाहनचालक देवीदास बोंबले यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. नाशिक प्रदेशाचे प्रादेशिक व्यवस्थापक उमेश वावरे, विभागीय व्यवस्थापक डॉ. सुजित नेवसे व सहाय्यक व्यवस्थापक प्रवीण डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असल्याची माहिती वनविकास विभागाकडून देण्यात आली.



