
खबरदार वाकडेतिकडे वाहन चालवाल तर धिंड निघणार
वणी पोलिसांनी काढली आयशरचालकांची धिंड
वणी पोलिस ठाणे हद्दीत भरधाव वाहन चालवून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या दोन आयशर वाहनचालकांविरुद्ध वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
याबाबत तिसगाव (ता. दिंडोरी) येथील शेतकरी अभिजित पांडुरंग भालेराव (४९) यांनी फिर्याद दिली आहे. बुधवारी (दि. १८) सकाळी ६.३० च्या सुमारास कन्हैया ढाबा ते मावडी फाटा दरम्यान हा प्रकार घडला. फिर्यादी हे आपल्या कारने तिसगाव येथून पिंपळगावकडून वणीकडे जात असताना समोरून येणाऱ्या दोन आयशरचालक रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत वेगात व नागमोडी वाहन चालवत होते. त्यामुळे इतर वाहनधारकांच्या जीवितास धोका निर्माण झाला. थांबण्याचा इशारा दिला असता, चालकांनी न थांबता पळून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आयशर (एमएच १५, जेसी ३१११) चालक हृषिकेश एकनाथ बर्डे (रा. देवगाव, ता. निफाड) तसेच दुसरा आयशर (एमएच १५, एचएक्स ३१११) चालक सचिन (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर वणी पोलिसांनी दोन्ही चालकांची धिंड काढून बेदरकार वाहनचालकांना कडक संदेश दिला. या गुन्ह्याचा तपास वणी पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



