तरुण पिढीला ‘सोल्युशन–व्हाइटनर’ची नशा; लहान मुलांचे आरोग्य धोक्यात
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

तरुण पिढीला ‘सोल्युशन–व्हाइटनर’ची नशा; लहान मुलांचे आरोग्य धोक्यात
सध्याच्या काळात तरुण पिढीसह लहान मुलांमध्येही सोल्युशन व व्हाइटनरच्या नशेचे प्रमाण चिंताजनक वेगाने वाढत आहे. शाळकरी वयातील मुलांना हे साहित्य अत्यंत सहज उपलब्ध होत असल्याने मुले किरकोळ पैशांत सोल्युशन व व्हाइटनर खरेदी करून नाकाने जोरात ओढून घेत आहेत. यामुळे क्षणिक नशा चढत असल्याने हे घातक व्यसन त्यांच्या अंगवळणी पडत चालले आहे.
सोल्युशन व व्हाइटनरमध्ये असलेले रासायनिक घटक मेंदूवर थेट परिणाम करतात. नशा उतरल्यानंतर डोकेदुखी, चक्कर येणे, उलट्या, स्मरणशक्ती कमजोर होणे, श्वसनास त्रास होणे असे गंभीर दुष्परिणाम दिसून येतात. दीर्घकाळ वापर केल्यास मेंदूचे नुकसान, हृदयविकार तसेच मृत्यूचाही धोका नाकारता येत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.
लहान मुले अभ्यासात मागे पडणे, वर्तनात बदल, आक्रमकपणा, घरातून पैसे चोरणे, एकाकी राहणे अशा समस्या वाढत असल्याचे पालकांच्या लक्षात येत आहे. मात्र अनेक पालक व शाळा प्रशासन या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.
या प्रकाराला आळा घालण्यासाठी दुकानदारांनी अल्पवयीन मुलांना सोल्युशन व व्हाइटनर विक्री टाळावी, शाळांमधून जनजागृती कार्यक्रम राबवावेत, पालकांनी मुलांवर लक्ष ठेवावे तसेच प्रशासनाने याबाबत कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.
वेळीच पावले उचलली नाहीत, तर सोल्युशन–व्हाइटनरची नशा भविष्यात तरुण पिढीसाठी गंभीर सामाजिक आणि आरोग्याचा प्रश्न ठरू शकते.



