सुरगाणा तालुक्यात ‘हनी मिशन’ अंतर्गत उंबरठाण येथे मधमाशी पालन प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

सुरगाणा तालुक्यात ‘हनी मिशन’ अंतर्गत मधमाशी पालन प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
भारतामध्ये राबविण्यात येत असलेल्या ‘मीठी क्रांती’ उपक्रमांतर्गत खादी आणि ग्रामोद्योग आयोग (KVIC) यांच्या ग्रामोद्योग विकास योजना – हनी मिशन कार्यक्रम 2025-26 अंतर्गत सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण येथे ५ दिवसीय आग्या माश्यांच्या पोळ्यातून मध व मेण काढण्याचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर प्रशिक्षणाचे आयोजन सेवावर्धिनी पुणे संस्थेकडून करण्यात आले.
या प्रशिक्षणासाठी आमझर, आंबाठा, सुळे, आमदा (प.), भवाडा, खांदुर्डी, अलंगुन व खोकरविहीर या आठ गावांतील प्रशिक्षणार्थींनी सक्रिय सहभाग नोंदविला.
प्रशिक्षणादरम्यान जंगलातील मधमाश्यांची वैशिष्ट्ये, मधमाश्यांचे संरक्षण कसे करावे, मधमाश्यांमुळे पर्यावरणाला होणारे लाभ तसेच शेतीतील उत्पादनवाढीत मधमाश्यांची भूमिका यांसंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली. सर्व विषयांवर प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात मास्टर ट्रेनर श्री. एस. एस. टरार, कार्यकारी अधिकारी, केंद्रीय मधमाशी अनुसंधान एवं प्रशिक्षण संस्थान (CBRTI) भारत सरकार तसेच खादी आणि ग्रामोद्योग आयोग यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण पार पडले. यावेळी UTMT धरमपुर येथील श्री. मधुकरभाई भोये व श्री. प्रकाशभाई गांगोडे यांनीही प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी सेवावर्धिनी पुणेचे प्रकल्प समन्वयक श्री. मधुकर चोथवा, ग्रामस्तरीय सहाय्यक गणेश पवार व पुष्पराज गावित उपस्थित होते.
सदर प्रशिक्षणामुळे सुरगाणा तालुक्यात मधमाशी पालन व्यवसायाला चालना मिळून ग्रामस्थांना रोजगारनिर्मितीची नवी दिशा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



