
भिंतबारी–ठाणापाडा रस्ता कामामुळे १३० शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; या कामामुळे धूळ उडत असल्याने शेती पिकाचे अतोनात नुकसान. तात्काळ नुकसानभरपाईची मागणी
सुरगाणा तालुक्यातील भिंतबारी (घागबारी) ते गुजरात सीमेजवळील ठाणापाडा या जवळपास १८ किलोमीटर रस्त्याच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. मात्र संबंधित विभागाने रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना अथवा नोटीस न देता काम हाती घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यावेळी सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे धूळ उडत असल्याने शेती पिकाचे अतोनात नुकसान होत आहे.
या रस्ता कामामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच घरे, दुकाने असे ३० ते ३५ व्यावसायिकाचे पण नुकसान होणार आहे. शेतकरी राजा यांनी सांगितले, “अस्मानी संकटामुळे शेतकरी आधीच त्रस्त आहे. त्यात अचानक सुरू झालेल्या रस्त्याच्या कामामुळे स्ट्रॉबेरी, टोमॅटोसह इतर पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. महागड्या स्ट्रॉबेरी लागवडीवर झालेले हे नुकसान भरून येणे कठीण आहे.
घागबारी, उंबरपाडा, सराड, चिखली, बोरगाव, हतगड आणि ठाणापाडा परिसरातील जवळपास १३० शेतकऱ्यांचे पिकांचे गंभीर नुकसानहोणार आहे. प्रभावित शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करण्याची मागणी केली आहे. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूने पंधरा – पंधरा फूट रोड चे काम केले जाणार आहे.
यावेळी जनार्दन भोये, प्रशांत भोये, भागवत गावित, लहानू गांगुर्डे, रामा गांगुर्डे, हिरामण भोये, काशिनाथ हाडस, भाऊराव बागुल यांसह शेतकऱ्यांनी चेतावणी दिली आहे की, प्रशासनाने वेळेत कारवाई न केल्यास नागझरी फाटा येथे मोठे जन आंदोलन छेडण्यात येणार आहे.
–