सुरगाणा तालुक्यात बेकायदेशीर ग्रामसभांविरोधात सर्वपक्षीय तक्रार
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

सुरगाणा तालुक्यात बेकायदेशीर ग्रामसभांविरोधात सर्वपक्षीय तक्रार
दि. 21 फेब्रुवारी 2026 रोजी सुरगाणा तालुका येथील विविध ग्रामपंचायतींमध्ये घेण्यात आलेल्या ग्रामसभांबाबत नियमभंग झाल्याचा आरोप करत सर्वपक्षीय पदाधिकारी, सरपंच व ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार संबंधित ग्रामसभांबाबत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आलेली नव्हती. ग्रामसभा घेण्याची कायदेशीर प्रक्रिया पाळण्यात आली नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे. तसेच एका राजकीय पक्षाच्या निवेदनाच्या आधारे दबाव टाकून पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून कोणताही शासन आदेश किंवा लेखी निर्देश नसताना ग्रामसेवकांना ग्रामसभा घेण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या ग्रामसभांमध्ये वनहक्क समित्यांचे पुनर्गठन करण्यात आले असून ही प्रक्रिया नियमबाह्य व कायदेशीर तरतुदींविरोधात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे दि. 21 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभा तात्काळ रद्द करून शासन नियमांनुसार नव्याने ग्रामसभा घेण्याचे आदेश द्यावेत, तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर निवेदन नाशिक जिल्हा परिषद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) सौ. फडोळ मॅडम यांच्याकडे सादर करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नेते चिंतामण गावित, माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाळराव धूम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष राजू पवार, नगरसेवक रमेश थोरात, नवसू गायकवाड तसेच सरपंच तुळशीराम महाले, आनंदा झिरवाळ, मोहन भोये, पुंडलिक घांगळे, राजेंद्र गावित, पुंडलिक बागुल यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य अशोक पवार, धनराज गायकवाड, विष्णू झुंबाड, नरेंद्र भोये, कृष्णा गायकवाड, मुरलीधर भोये, पोपट भोये, मोहन चौधरी, भाऊराव महाले, वसंत चौरे, रामदास केंगा, सावळीराम महाले, झोटिंग बागुल आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.



