आदिवासींची वनजमीन कोणीही हिरावू शकत नाही : कॉ. जे. पी. गावित
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

आदिवासींची वनजमीन कोणीही हिरावू शकत नाही : कॉ. जे. पी. गावित
सुरगाणा तालुक्यातील उंबरपाडा येथे फॉरेस्ट प्लॉट धारकांच्या वनजमीन मागणीसाठी नव्या अर्जांची नोंदणी करण्यात आली. यावेळी कॉ. जे. पी. गावित यांनी “वनजमीन हा आदिवासी बांधवांचा अविभाज्य हक्क असून तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही,” असे ठाम प्रतिपादन केले.
लॉंग मार्चमधील वनजमीन, पेसा भरती, जिल्हापरिषद शिक्षक भरती व नार-पार पाणीप्रश्न यांसारख्या मागण्यांसाठी आदिवासी बांधवांनी मुंबईकडे पायी मोर्चा काढला होता. शहापूरजवळील खर्डी येथे आंदोलन पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने चर्चेसाठी निमंत्रण दिले. तीन महिन्यांत प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन देण्यात आल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.
स्वतंत्र सातबारा, दहा एकरपर्यंत वाढीव जमीन, अपात्र दावे पात्र करणे व नव्या प्रकरणांची नोंद या मागण्यांसाठी अर्ज भरण्यात आले. येत्या २७ फेब्रुवारी रोजी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करण्यात येणार असून मोठ्या संख्येने वनपट्टाधारकांनी नाशिकला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी पक्षाचे पदाधिकारी, डीवायएफआय कार्यकर्ते व फॉरेस्ट प्लॉट धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



