१ मार्चपासून सवलतीसाठी NCMC कार्ड बंधनकारक; MSRTC कडून ज्येष्ठ, महिला व मुलींनी तातडीने काढावे आवाहन
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

१ मार्चपासून सवलतीसाठी NCMC कार्ड बंधनकारक; MSRTC कडून ज्येष्ठ, महिला व मुलींनी तातडीने काढावे आवाहन
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) तर्फे प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलतींसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार १ मार्च २०२६ पासून सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. संबंधित कार्ड जवळ नसल्यास बसमध्ये सवलत दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
MSRTC मार्फत सर्व वयोगटातील मुली व महिलांना तसेच ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील पुरुष ज्येष्ठ नागरिकांना भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात येते. तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ अंतर्गत १०० टक्के मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सवलतींचा लाभ घेण्यासाठी आता स्मार्ट NCMC कार्ड आवश्यक असणार आहे.
हे कार्ड संबंधित जवळच्या बस डेपोमध्ये उपलब्ध असून, अर्ज करताना आधार कार्ड सादर करणे आवश्यक आहे. कार्डसाठी सुमारे ₹१९९ शुल्क आकारण्यात येत असून, जुने कार्ड बदलून नवीन कार्ड घेण्यासाठी ₹१४९ शुल्क आकारले जात आहे. कार्ड फक्त MSRTC कार्यालयातच मिळणार असल्याने प्रवाशांनी इतरत्र चौकशी करून वेळ वाया घालवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
महिलांनी, मुलींनी व ज्येष्ठ नागरिकांनी १ मार्चपूर्वीच NCMC कार्ड काढून घ्यावे, अन्यथा सवलतीच्या प्रवासात अडचणी निर्माण होऊ शकतात. गैरसोय टाळण्यासाठी लवकरात लवकर संबंधित डेपो येथे संपर्क साधावा, असेही महामंडळाकडून कळविण्यात आले आहे.



