
भनवड–बोरवण रस्त्याची दैना; नागरिकांचा तीव्र संताप
दिंडोरी तालुक्यातील दुर्गम भागातील दिंडोरी तालुक्यातील भनवड ते बोरवण या मार्गाची अतिशय दुरावस्था झाली असून संबंधित प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. परिणामी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
दिंडोरी तसेच सुरगाणा–पेठ तालुक्यांना जोडणारा चिकाडी–मोखनूळ–बोरवण–भनवड असा महत्त्वाचा दळणवळणाचा रस्ता असून भनवड ते बोरवण दरम्यान सुमारे चार ते पाच किलोमीटरचा तीव्र उताराचा घाट आहे. मागील दीड ते दोन वर्षांपासून या घाटातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालविणे धोकादायक ठरत आहे.
रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे अनेक वाहनांचे नुकसान होऊन ती नादुरुस्त होत आहेत. तसेच दररोज लहान-मोठे अपघात घडत असल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात घनदाट जंगल असून दिवसा देखील बिबट्याचे दर्शन होत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. अशा परिस्थितीत खराब रस्त्यामुळे चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
एखादा मोठा अपघात घडल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या मार्गाकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याची डागडुजी करावी तसेच काँक्रीटिकरण अथवा डांबरीकरण करून नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिक व वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.



