कळवणच्या ओतूरमध्ये अवैध दारूचा उघडउघड धंदा; प्रशासनाच्या नजरेआड की कोणाच्या छत्रछायेखाली?”
रस्त्यालगत दिवसभर देशी-विदेशी दारू विक्री; नागरिकांत संताप, महिलांकडून कडक कारवाईची मागणी

“कळवणच्या ओतूरमध्ये अवैध दारूचा उघडउघड धंदा; प्रशासनाच्या नजरेआड की कोणाच्या छत्रछायेखाली?”
रस्त्यालगत दिवसभर देशी-विदेशी दारू विक्री; नागरिकांत संताप, महिलांकडून कडक कारवाईची मागणी
कळवण तालुक्यातील ओतूर व आजूबाजूचा परिसर सध्या देशी-विदेशी अवैध दारू विक्रीचा बालेकिल्ला बनत चालल्याची धक्कादायक स्थिती समोर येत आहे. एकीकडे राज्यात दारूबंदी, अमली पदार्थांवर नियंत्रण आणि कायद्याची कडक अंमलबजावणी याबाबत मोठमोठ्या घोषणा होत असताना प्रत्यक्षात मात्र डांबरी रस्त्याच्या कडेला दिवसभर खुलेआम दारू विक्री सुरू असल्याचे चित्र ओतूर परिसरात पाहायला मिळत आहे.
सुमारे पंधरा दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महाजन नाशिक दौऱ्यावर आले असताना त्यांनी “नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे, प्रशासनाची बारीक नजर आहे,” असे वक्तव्य केले होते. मात्र ओतूर परिसरातील वास्तव वेगळेच प्रश्न निर्माण करत असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे. जर प्रशासनाची नजर इतकी बारीक असेल, तर रस्त्यालगत उघडपणे होणारी देशी-विदेशी दारूची विक्री कोणाच्या छत्रछायेखाली सुरू आहे, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक राज देवरे (ओतूर-कुंडाणे) यांनी उपस्थित केला आहे.
राज्य शासनाने दारू विक्री व उत्पादनावर नियंत्रण ठेवण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाची स्वतंत्र यंत्रणा उभी केली आहे. मात्र स्थानिकांच्या मते कारवाई केवळ कागदावरच मर्यादित राहिल्याचे दिसते. “सकाळी धाड टाकली जाते, पण सायंकाळी त्याच ठिकाणी पुन्हा दारू विक्री सुरू होते,” असे नाव न छापण्याच्या अटीवर एका नागरिकाने सांगितले. त्यामुळे ही परिस्थिती केवळ कायद्याला आव्हान देणारी नसून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे.
अवैध दारू विक्रीमुळे गावातील महिलांमध्ये विशेष नाराजीचे वातावरण आहे. दारूच्या व्यसनामुळे घरगुती भांडणे, आर्थिक हालअपेष्टा आणि तरुण पिढीचे बिघडणारे आयुष्य याबाबत महिलांनी चिंता व्यक्त केली आहे. शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांवरही या वातावरणाचा विपरीत परिणाम होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. “गावात भीतीचे वातावरण आहे; विरोध केला तर त्रास होईल,” अशी भावना काही नागरिकांनी व्यक्त केली.
शेतीप्रधान व शांततेसाठी ओळखला जाणारा ओतूर परिसर आज अवैध दारू विक्रीमुळे बदनाम होत असल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. शासन आणि प्रशासनाने केवळ घोषणांवर न थांबता सातत्यपूर्ण, कठोर आणि पारदर्शक कारवाई करावी, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.
कायद्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा नाशिक जिल्हा खरोखरच कायद्याच्या अंमलबजावणीत मजबूत आहे का, की ओतूरसारख्या भागात अवैध दारू विक्रीचा अड्डा वाढत चालला आहे, असा थेट प्रश्न नागरिक विचारत असून आता सर्वांच्या नजरा प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे लागल्या आहेत.



