सुरगाणा तालुक्यातील विद्यार्थ्यांची विज्ञान नगरीकडे भरारी – पहिलाच विमान प्रवास ठरणार अविस्मरणीय!
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

सुरगाणा तालुक्यातील विद्यार्थ्यांची विज्ञान नगरीकडे भरारी – पहिलाच विमान प्रवास ठरणार अविस्मरणीय!
नाशिक जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल सुरगाणा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या दिशेने प्रगतीची नवी झेप घेतली आहे. गटशिक्षणाधिकारी अल्पा देशमुख यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘सुरगाणा सायन्स टॅलेंट सर्च’ उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत यश संपादन करून इयत्ता ४ थी ते ८ वीतील जिल्हा परिषद शाळांमधील २० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना अहमदाबाद येथील सायन्स सिटीला भेट देण्याची सुवर्णसंधी मिळाली असून विशेष म्हणजे हा त्यांचा पहिलाच विमान प्रवास ठरणार आहे.
दुर्गम भागातील अनेक विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्दीने अभ्यास करून या स्पर्धेत यश मिळवले आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानाचे प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळणार असून त्यांच्या कल्पनाशक्तीला नवी दिशा मिळणार आहे.
अहमदाबाद येथील सायन्स सिटीमध्ये विविध विज्ञान प्रदर्शन, अत्याधुनिक तंत्रज्ञान, रोबोटिक्स तसेच अंतराळ विज्ञानाशी संबंधित आकर्षक प्रात्यक्षिकांचा अनुभव विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयीची आवड आणि कुतूहल अधिक वाढण्यास मदत होणार आहे.
पहिल्यांदाच विमान प्रवासाची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह असून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्सुकता स्पष्ट दिसून येत आहे. पालक व शिक्षकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
या उपक्रमात ऋषी बागुल, लावण्या भोये, सिद्धार्थ खंबाईत, साई चव्हाण, हर्षल देशमुख, आदित्य गायकवाड, हर्षद चव्हाण, तन्मय तवील, साक्षी पाल, वेदांत दातार, फिजन शेख, दिव्या गावित, रोशनी महाले, हितेश पवार, रोनक पवार, आरुषी वाघमारे, वंदना थविल, गणराज जाधव, धीरज भोये, दिव्यानी गवळी यांचा समावेश आहे.
यावेळी गटशिक्षणाधिकारी अल्पा देशमुख यांच्यासह महेश नेहे, यशवंत चौधरी, सुधाकर भोये, मोतीराम भोये, हरेराम गावित, पद्माकर गायकवाड, योगिता महाले आदी उपस्थित होते.
दरम्यान, हे विद्यार्थी २४ मार्च रोजी नाशिक विमानतळावरून अहमदाबादकडे रवाना झाले. हा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, “आम्हीही मोठी स्वप्ने पाहू शकतो आणि ती पूर्ण करू शकतो,” असा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे.


