ब्रेकिंग न्यूज,पुणे-नाशिक महामार्गावर कारवाई : 1.69 कोटींचे विदेशी मद्य जप्त; चालक अटकेत
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

पुणे-नाशिक महामार्गावर कारवाई : 1.69 कोटींचे विदेशी मद्य जप्त; चालक अटकेत
राज्यातील विदेशी मद्यसाठ्याची अवैध वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने नाशिकमध्ये धडक कारवाई करत तब्बल 1 कोटी 69 लाख 8 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील शिंदे टोल नाक्याजवळ ही कारवाई करण्यात आली.
विभागीय भरारी पथकाला 5 एप्रिल 2026 रोजी गुप्त बातमीदाऱ्यामार्फत माहिती मिळाल्यानंतर शिंदे शिवार परिसरात सापळा रचण्यात आला. दरम्यान, तपकिरी-पिवळ्या रंगाचे अशोक लेलँड कंपनीचे सहा चाकी कंटेनर (HR-47-F-6015) संशयास्पदरीत्या येताना दिसल्याने वाहन अडवण्यात आले.
चालकाने सुरुवातीला वाहनात इलेक्ट्रॉनिक साहित्य असल्याचे सांगितले. मात्र, तपासणी केली असता कंटेनरमध्ये गोवा राज्यात निर्मित व तेथेच विक्रीसाठी असलेले परराज्यातील विदेशी मद्य आढळून आले.
या कारवाईत 10.863 बल्क लिटर (1235 बॉक्स) विदेशी मद्य, सहा चाकी कंटेनर आणि एक मोबाईल संच असा एकूण 1,69,08,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी प्रेमकुमार जनकधारी सिंग (वय 58, रा. बिहार) या चालकास अटक करण्यात आली असून वाहन मालकासह इतर संशयित आरोपी फरार आहेत.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे आणि विभागीय उपआयुक्त उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सहभागी पथक:
श्री. पी. एम. गोडा (निरीक्षक), श्री. राहुल सुभाष मोडक (दुय्यम निरीक्षक), श्री. किरण गांगुर्डे (सहायक दुय्यम निरीक्षक), श्री. धनराज पवार, श्री. युवराज रतवेकर, श्री. महेश सातपुते, श्री. राहुल पवार, श्री. विलास कुवर तसेच सौ. सुनिता महाजन यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक राहुल सुभाष मोडक करीत आहेत.

