बालिका अत्याचार प्रकरणी मुख्याध्यापकाला जन्मठेप, वर्गशिक्षकाला ६ महिन्यांची शिक्षा)
इगतपुरी तालुक्यातील टाकेद येथील १३ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार प्रकरणी मुख्याध्यापक तुकाराम साबळेला जन्मठेपेची, तर सहआरोपी वर्गशिक्षक गोरखनाथ जोशीला ६ महिने कारावासाची शिक्षा फास्टट्रॅक कोर्टाने सुनावली.
तालुक्यातील टाकेद येथील न्यू इंग्लिश स्कूलचा मुख्याध्यापक साबळेने सहावीतील विद्यार्थिनीला वर्गशिक्षक जोशीच्या मदतीने घरी बोलावत लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार ७ फेब्रुवारी २०२५ मध्ये घडला होता. याबाबत घोटी पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला हाेता. ग्रामस्थांसह राजकीय पक्ष संघटनांनी आंदोलन करीत ही केस फास्टट्रॅक न्यायालयात चालवण्याची मागणी केली होती. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश पी. व्ही. घुले यांनी गुरुवारी (दि. २) संशयित तुकाराम गोविंद साबळे (५२, रा. टाकेद, ता. इगतपुरी) याला पोक्सोनुसार आजन्म कारावास आणि २ लाख रुपये दंड तसेच दंड न भरल्यास १ वर्षाची साधी कैद, कलम १० नुसार ७ वर्षांचा सक्त कारावास आणि २५ हजार रुपये दंड, कलम ८ नुसार ५ वर्षे सक्त कारावास आणि २५ हजार रुपये दंड तसेच सहआरोपी गोरखनाथ मारुती जोशी (४३, रा. जोशीवाडी, ता. इगतपुरी) याला पोक्सो कलम २१ मध्ये दोषी ठरवत ६ महिने साधी शिक्षा व ६८ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. तत्कालीन पोलिस निरीक्षक विनोद पाटील, उपनिरीक्षक अजय कवटे, हवालदार सतीश शेलार, श्रीकांत खैरे, मारुती बोराडे, नीलेश साळवे यांनी तपास केला होता. सरकारी अभियोक्ता म्हणून लीना चव्हाण यांनी काम पाहिले.
या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.