पेठ तालुक्यातील कोटंबी घाटात पोलिसांची मोठी कारवाई १३.५५ लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त; २८.५५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पेठ तालुक्यातील कोटंबी घाटात पोलिसांची मोठी कारवाई
१३.५५ लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त; २८.५५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
धरमपूर–पेठ–नाशिक मार्गावरील कोटंबी घाटात जिल्हा ग्रामीण विशेष पथकाने अवैध विदेशी दारू वाहतुकीवर मोठी कारवाई करत तब्बल १३ लाख ५५ हजार ४४० रुपयांचा विदेशी मद्यसाठा जप्त केला. यासह १५ लाख रुपये किमतीचा ट्रक व १० हजारांचा मोबाईल असा एकूण २८ लाख ५५ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
गुजरात राज्यातून महाराष्ट्रात अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणारा ट्रक पेठ मार्गे नाशिककडे जाणार असल्याची गोपनीय माहिती जिल्हा नियंत्रक कक्षास प्राप्त झाली होती. त्यानुसार नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्याशी चर्चा करून विशेष पथकाला कारवाईचे आदेश दिले.
पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके, पोलीस हवालदार कैलास बागुल, किरण आहेर व पो.कॉ. श्रीराम वारुंगसे यांच्या पथकाने कोटंबी घाटात दबा धरून गुजरातहून नाशिककडे जाणारा आयशर ट्रक (एमएच ०४ एलई ६९७४) थांबवला. चालक दीपक संजय काळे (रा. बोधेगाव, ता. दारवा, जि. यवतमाळ) याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संशय बळावला.
प्राथमिक पाहणीत ट्रक रिकामा दिसत असला, तरी ताडपत्रीखालील रचना व आतील खोलीतील तफावत पोलिसांच्या लक्षात आली. वाहन पेठ पोलीस ठाण्यात आणून तपासणी केली असता तयार केलेल्या चोर कप्प्यात मोठ्या प्रमाणात विदेशी दारू साठवलेली आढळून आली.
यामध्ये मॅकडॉल नं. १ (३४ बॉक्स), जॉन मार्टीन (४१ बॉक्स), रॉयल स्पेशल प्रीमियम (२० बॉक्स), रॉयल स्टॅग (१० बॉक्स), रॉयल चॅलेंज (एकूण २८ बॉक्स), डीएसपी ब्लॅक (३ बॉक्स) असा मद्यसाठा आढळून आला.
या प्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात अवैध मद्य वाहतुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक द्वारकानाथ गोंदके अधिक तपास करीत आहेत. जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध मद्यव्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.



