विशेष वृतान्त
दारूबंदीची हाक, महिलांचा रस्तारोको; प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात संतापाचा उद्रेक”
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

माळे फाटा परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध दारू विक्रीविरोधात बुधवारी (दि. १०) शेकडो महिलांनी आक्रमक आंदोलन छेडत प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी काही काळ शिर्डी–सूरत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून, अवैध दारू विक्रीमुळे उद्ध्वस्त होत असलेल्या कुटुंबांचे वास्तव महिलांनी प्रशासनासमोर मांडले.
परिसरात अनेक दिवसांपासून अवैध देशी व विदेशी दारूची खुलेआम विक्री सुरू असल्याचा आरोप करत महिलांनी रस्त्यावर उतरून तीव्र निषेध व्यक्त केला. वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संतप्त महिलांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. “दारूमुळे युवक व्यसनाधीन होत आहेत, कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत आणि प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे,” असा आरोप आंदोलकांनी केला.
आंदोलनाची माहिती मिळताच पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महिलांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या. अवैध दारू विक्रीविरोधात योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
मात्र, या घटनेमुळे अवैध दारू व्यवसायाला कोणाचा आशीर्वाद आहे का, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. महिलांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया परिसरातून उमटत आहे.


