शासकीय आश्रम शाळा सालभोये येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

शासकीय आश्रम शाळा सालभोये येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
सुरगाणा तालुक्यातील सालभोये येथील शासकीय आश्रम शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संगीतमय ताट-आरतीने प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
जयंतीनिमित्त सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याची व शिक्षणाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व थोर समाजसुधारक होत्या. त्यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी झाला. स्त्री शिक्षणाच्या अभावामुळे समाज मागासलेला आहे, हे ओळखून त्यांनी पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सोबत १८४८ साली पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्या काळात स्त्री शिक्षणाला तीव्र विरोध असतानाही सामाजिक बहिष्कार, शेण-दगडफेक सहन करत त्या नियमित शाळेत जात राहिल्या. शिक्षणाच्या माध्यमातून स्त्रियांना स्वावलंबी व सक्षम बनविणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता.
विधवा स्त्रियांसाठी आश्रयगृहे सुरू करणे, बालहत्या रोखण्यासाठी कार्य करणे तसेच कवितांद्वारे समाजप्रबोधन करणे असे अनेक समाजोपयोगी उपक्रम त्यांनी राबविले. त्यांच्या कार्यातून आजही शिक्षणातील समानता व मानवतेचा मार्ग दिसून येतो, असे उदाहरणांसह शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.
कार्यक्रमात सूरज वाघमारे (इ. १० वी), प्रणिता भोये (इ. १० वी) आणि विशाखा गवळी (इ. ९ वी) यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर प्रभावी भाषणे केली.
या प्रसंगी शाळेतील शिक्षक श्री. बी. डी. भोये, श्री. पी. एस. गवळी, श्री. जी. एच. भोये, श्री. एन. आर. खबाईत, श्री. चेके सर (अधिक्षक), श्रीमती एम. आर. बहिरम, श्रीमती हौसा बहिरम, श्रीमती सुरेखा देशमुख, स्टाफ नर्स श्रीमती योगिता भोये आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. पी. एच. बागुल होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती मीना बाजीराव बनसोडे उपस्थित होत्या.
सूत्रसंचालन एस. वाय. गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. रमेश चव्हाण सर यांनी केले. अखेरीस सावित्रीबाई फुले यांची आरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


