# सुरगाणा तालुक्यातील पालविहीर गावात शेततळ्यामुळे शेतीला नवे बळ – आवाज जनतेचा
कृषी

सुरगाणा तालुक्यातील पालविहीर गावात शेततळ्यामुळे शेतीला नवे बळ

स्वदेस फाउंडेशनच्या सहकार्याने जलसंधारणातून वाढले उत्पन्न

सुरगाणा तालुक्यातील पालविहीर गावात शेततळ्यामुळे शेतीला नवे बळ
स्वदेस फाउंडेशनच्या सहकार्याने जलसंधारणातून वाढले उत्पन्न

सुरगाणा तालुक्यातील पालविहीर गावात स्वदेस फाउंडेशनच्या नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन (एनआरएम) उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडताना दिसत आहेत. डॉईचे बँक यांच्या आर्थिक सहकार्याने गावातील राजेंद्र देवराम गावित, चंदर काळू गावित व हिरामण भावडू महाले या तीन शेतकऱ्यांच्या शेतात एकत्रित शेततळे उभारण्यात आले आहे.

110 फूट रुंदी, 115 फूट लांबी आणि 10 फूट खोली असलेल्या या शेततळ्यात सुमारे 30 लाख लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. या पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांनी प्रत्येकी एक एकर क्षेत्रात आंबा व पेरूची फळबाग तसेच भाजीपाला शेती सुरू केली आहे.

या फळबाग शेतीतून शेतकऱ्यांनी आतापर्यंत पेरू विक्रीद्वारे ₹70,000 पेक्षा अधिक उत्पन्न मिळवले असून त्यांच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे.

मागील वर्षी उन्हाळ्यात पाण्याअभावी टँकरद्वारे झाडांना पाणी द्यावे लागत होते. मात्र यावर्षी शेततळ्यामुळे हा प्रश्न सुटला असून उन्हाळ्यातही शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे.

याशिवाय शेततळ्यात रोहू जातीचे मासे सोडण्यात आले असून त्यातून ₹80,000 ते ₹90,000 पर्यंत अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात स्थैर्य व आत्मविश्वास निर्माण झाला असून त्यांनी स्वदेस फाउंडेशन व डॉईचे बँक यांचे आभार व्यक्त केले आहेत.

स्वदेस फाउंडेशन चे संस्थापक रॉनी स्क्रूवाला व झरीना स्क्रूवाला यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यात गाव विकास समितीच्या सहकार्याने ग्रामीण सक्षमीकरणाचे कार्य सुरू आहे. स्वच्छ, सुंदर, निरोगी, सक्षम, आत्मनिर्भर व पर्यावरणपूरक गावे उभारण्याच्या ध्येयाने मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे व नाशिक जिल्हा प्रमुख मनोज आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वप्नातील गावे’ साकारली जात आहेत.

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!