भवाडा–गहाले रस्त्याची दयनीय अवस्था; दीड वर्षांपासून काम रखडल्याने ग्रामस्थ त्रस्त
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

भवाडा–गहाले रस्त्याची दयनीय अवस्था; दीड वर्षांपासून काम रखडल्याने ग्रामस्थ त्रस्त
भवाडा ते गहाले या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून गेल्या दीड वर्षांपासून रस्त्याचे काम रखडल्यामुळे ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सुमारे अडीच ते तीन किलोमीटरपर्यंत रस्त्यावरची पूर्ण खडी निघून गेली असून अनेक ठिकाणी रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे.
काही ठिकाणी वाहन चालवणेही कठीण झाले असून नागरिकांना दुचाकी हाताने ढकलत नेण्याची वेळ येत आहे. रस्त्यावर उखडलेली खडी असल्यामुळे अनेक वाहनचालक घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ठेकेदाराने दीड वर्षांपूर्वी रस्त्यावर खडी टाकून काम अर्धवट सोडले आहे. मात्र त्यानंतर काम पुन्हा सुरू करण्यात आलेले नाही. यामुळे रस्त्याच्या कडेला खडीचे ढिग साचले असून समोरून येणाऱ्या वाहनांना साईड देणेही कठीण झाले आहे.
या समस्येमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.


