आंब्याच्या मोहोरावर भुरी व किडींचा प्रादुर्भाव; उत्पादकांवर आर्थिक संकटाचे सावट
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल
आंब्याच्या मोहोरावर भुरी व किडींचा प्रादुर्भाव; उत्पादकांवर आर्थिक संकटाचे सावट
सुरगाणा तालुक्यात आंब्याला मोहोर येण्यास सुरुवात होत असतानाच अवकाळी पावसाने आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकली आहे. पाच ते सहा दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे मोहोराच्या सुरुवातीच्या टप्प्यातच भुरी रोगासह विविध किडींचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे. परिणामी संभाव्य उत्पादन घट व आर्थिक नुकसानाची भीती व्यक्त केली जात आहे.
सध्या मोहोरावर रसशोषक किडींमध्ये तुडतुडे, फुलकिडे व कोळी यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या किडी मोहोरातील रस शोषत असल्याने फुले व लहान फळांची गळ होत आहे. त्यामुळे फळधारणेवर प्रतिकूल परिणाम होऊन अंतिम उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याशिवाय हवामानातील सातत्याने होणारे बदल, आर्द्रता, थंडी व अचानक वाढणारी उष्णता यांमुळे भुरीसारख्या बुरशीजन्य रोगांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मोहोराचे देठ, फुले तसेच नुकतीच लागलेली लहान कैरी गळून पडत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी अनेक शेतकरी सकाळच्या थंड वातावरणात आंबा बागांमध्ये पाण्याची बारीक फवारणी करत आहेत. मोहोरावरील बुरशीचा प्रादुर्भाव कमी करून लागलेली कैरी टिकवून ठेवण्याचा त्यामागील उद्देश आहे. मात्र तज्ञांचे मार्गदर्शन व योग्य तांत्रिक सल्ला न मिळाल्याने काही शेतकरी संभ्रमावस्थेत असून शासनाच्या कृषी विभागाने तत्काळ पंचनामा करून मार्गदर्शन व सहाय्य करावे, अशी मागणी आंबा उत्पादकांकडून होत आहे.



