# सुरगाणा तालुक्यात कृषी केंद्रात युरियाचा तीव्र तुटवडा पिकांची वाढ खुंटली; शेतकरी चिंतेत – आवाज जनतेचा
कृषी

सुरगाणा तालुक्यात कृषी केंद्रात युरियाचा तीव्र तुटवडा पिकांची वाढ खुंटली; शेतकरी चिंतेत

सुरगाणा तालुक्यात कृषी केंद्रात युरियाचा तीव्र तुटवडा
पिकांची वाढ खुंटली; शेतकरी चिंतेत

सुरगाणा तालुक्यातील कृषी केंद्र व ग्रामीण भागातील खत विक्री दुकानांमध्ये युरियाचा तीव्र तुटवडा जाणवत असून त्यामुळे खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंटली आहे. मका, सोयाबीन, कडधान्ये, गहू , हरभरा तसेच भाजीपाला पिकांना युरियाची नितांत आवश्यकता असताना ते उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
खरीप हंगामात पिकांची वाढ जोमात होण्यासाठी योग्य वेळी युरियाचा डोस देणे अत्यावश्यक असते. मात्र सध्या तालुक्यात कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. खत कंपन्यांकडून ‘लिंकिंग’ पद्धतीची सक्ती करण्यात येत असून, युरियासोबत दुप्पट किमतीची इतर खते, तणनाशके खरेदी करण्याचा दबाव दुकानदारांवर टाकला जात असल्याचे चित्र आहे. या सक्तीमुळे अनेक दुकानदारांनी युरियाची खरेदीच बंद केली असून, परिणामी शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी दररोज गावातील दुकानांमध्ये चौकशी करीत आहेत. मात्र “युरिया उपलब्ध नाही” असे सांगून त्यांना नकार दिला जात आहे. नुकतीच लागवड झालेल्या उसाला तसेच वाढीच्या अवस्थेत असलेल्या कडधान्य व मका पिकांना वेळेवर युरिया न मिळाल्याने उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात हीच परिस्थिती कायम आहे.
युरियाच्या ५० किलो गोणीची शासनमान्य किंमत २६६ रुपये असताना काही ठिकाणी जादा दराने विक्रीचे प्रकारही समोर येत असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
याबाबत तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव तिखे यांनी सांगितले की, “सुरगाणा तालुक्यात मागणी वाढल्याने युरियाची टंचाई भासत आहे. जादा दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कार्यवाही करण्यात येईल. जिल्हा स्तरावरून युरियाची अतिरिक्त मागणी करण्यात आली असून लवकरच पुरवठा सुरळीत केला जाईल.”
दरम्यान, गहू, हरभरा, मका आदी पिकांसह भाजीपाला पिकांसाठी तातडीने युरिया उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. शासनाने याप्रकरणी तातडीने हस्तक्षेप करून युरियाचे संकट दूर करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!