नाशिकमध्ये उद्या धडकणार लाल वादळ
किसान सभेचे ३० हजार कार्यकर्ते लाँग मार्चद्वारे मुंबइकडे मार्गस्थ

नाशिकमध्ये उद्या धडकणार लाल वादळ
किसान सभेचे ३० हजार कार्यकर्ते लाँग मार्चद्वारे मुंबइकडे मार्गस्थ
बोरगाव । लक्ष्मण बागूल
आदिवासी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या माध्यमातून गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यातील चार ठिकाणी सुरू असलेले ठिय्या आंदोलन करण्यात येत होते. मात्र, याची दखल प्रशासनाने घेतली नसल्यामुळे हे मोर्चेकरी नाशिककडे आगेकूच करत आहेत. यात सुरगाणा तालुक्यातील बोरगाव, निफाड, त्र्यंबकेश्वर तालुक्यांतील हरसूल, पेठ, सटाणा – चांदवड येथील मोर्चेकरी लाँग मार्चद्वारे नाशिककडे आगेकूच करत आहेत. विशेष म्हणजे ते यावेळी नाशिकमध्ये जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा न करता शनिवारी थेट मुंबईकडे आगेकूच करणार आहेत.
आदिवासी भागात विविध सोयी सुविधांबाबत शासनाने वेळोवेळी आश्वासने दिली होती. मात्र, यातील अनेक आश्वासने पाळली गेली नसल्यामुळे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने बोरगाव, हरसूल, पेठ, चांदवड, दिंडोरी, सटाणा, निफाड या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. मात्र, त्यातून काहीच निर्णय होत नसल्यामुळे हे सर्व आंदोलक नाशिककडे कूच करीत आहेत. बोरगाव येथून निघालेले १५ हजार मोर्चेकरी गुरुवारी (दि. २२) दिंडोरीत मुक्कामी पोहोचले. सटाणा – चांदवड येथील सुमारे दोन हजार मोर्चेकरी शिरवाडे वणी परिसरात मुक्कामी आहेत. पेठहून निघालेल्या मोर्चात सुमारे पाच हजार मोर्चेकरी सहभागी झाले असून, ते गोळशी फाटा परिसरात मुक्कामी थांबले होते. हरसूल येथील सुमारे तीन हजार मोर्चेकरी वाघेरा घाट पार करीत मुक्कामी थांबले आहेत. यासह दिंडोरीतील सुमारे पाच हजार मोर्चेकरी बोरगावच्या लाँग मार्चमध्ये सहभागी होतील. हे सर्व माेर्चेकरी शनिवारी (दि. २४) सकाळी नाशिक आणि तेथून मुंबईला जाण्याचा निर्णय घेऊन आगेकूच सुरू झाली आहे. या मोर्चात भिका राठोड, देवीदास गावित, अशोक धूम, वसंत बागूल, नितीन गावित, उत्तम कडू, हिरामण गावित, इंद्रजित गावित, रामभाऊ गहला, डॉ. देवराम गायकवाड, इरफान शेख, रमेश बरफ, अशोक खैरनार, हनुमंत गुंजाळ, तुकाराम गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झालेले आहेत



