सुरगाण्यात लोकप्रतिनिधीचे कार्यकर्ते झाले ‘कंत्राटदार’
ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांचे जीवनमान उंचावावे, गावांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने शासनाकडून कोट्यवधी रुपयांच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. जिल्हा परिषदेचे अनेक अधिकार प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पंचायत समिती व ग्रामपंचायतींकडे सोपविण्यात आले आहेत. मात्र सुरगाणा तालुक्यात ग्रामविकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बोकाळल्याचे गंभीर चित्र समोर येत आहे.
गावागावातील गल्लीबोळातील राजकारणी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते हेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ठेकेदार बनले असून, त्यांच्या निकटवर्तीय हितचिंतकांमार्फत विकासकामांचा बाजार मांडला जात आहे. काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने टक्केवारीच्या व्यवहारातून कामे मंजूर करून घेतली जात असून, निकृष्ट दर्जाची बांधकामे, दुरुस्तीची कामे व अपूर्ण प्रकल्प यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा निधी वाया जात आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत तसेच ग्रामपंचायत स्तरावर विविध योजनांतून रस्ते, नळपाणी, सांडपाणी, सभामंडप, अंगणवाडी दुरुस्ती आदी कामे मंजूर करण्यात येतात. मात्र हीच कामे करण्यासाठी लोकप्रतिनिधी, राजकारणी व कार्यकर्तेच ठेकेदार होत असल्याचे उघड गुपित असून, काम मंजुरीसाठी अधिकाऱ्यांना ठरावीक टक्केवारी दिली जाते, असा आरोप होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या ‘खास माणसांनाच’ ही कामे दिली जात असल्याने दलालांचे जिल्हा परिषद कार्यालयात खुलेआम वावर दिसून येतो.
या भ्रष्ट साखळीमुळे खऱ्या गरजू लाभार्थ्यांना विकासापासून दूर राहावे लागत असून दर्जेदार कामांना तिलांजली दिली जात आहे. चौकशी झालीच तर संबंधित अधिकारी आपसांत आर्थिक व्यवहार करून प्रकरण दाबण्याचा प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे. परिणामी ‘आंधळा दळतो आणि बहिरा पीठ खातो’ अशी अवस्था निर्माण झाली आहे.
सुरगाणा तालुक्यात ग्रामविकासाच्या नावाखाली चाललेल्या या ठेकेदारी राजकारणाला आळा कधी बसणार? भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्यांवर कडक कारवाई होणार का? असा संतप्त सवाल आता जनतेतून उपस्थित होत आहे.
या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.