सुरगाणा यात्रेत नकली नोटांचा सुळसुळाट; व्यावसायिकाला ८०० रुपयांची फसवणूक
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

सुरगाणा यात्रेत नकली नोटांचा सुळसुळाट; व्यावसायिकाला ८०० रुपयांची फसवणूक
सुरगाणा येथील यात्रेत नकली नोटा खपविण्याचा प्रकार उघडकीस आला असून एका व्यावसायिकाची ८०० रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. गर्दीचा फायदा घेत काही अज्ञात व्यक्तींनी ५०, १०० आणि जुन्या १०० रुपयांच्या नोटांच्या माध्यमातून दुकानदारांची फसवणूक केल्याचे समजते.
यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असल्याने व्यवहार करताना दुकानदारांना नोटा तपासण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. याचाच गैरफायदा घेत संबंधितांनी नकली नोटा चलनात आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. फसवणूक झालेल्या व्यावसायिकाला एकूण ८०० रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.
या पार्श्वभूमीवर सुरगाणा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी सर्व व्यावसायिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. व्यवहार करताना नोटांची बारकाईने पडताळणी करावी, संशयास्पद व्यवहार त्वरित पोलिसांच्या निदर्शनास आणावेत, तसेच सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवावी, असेही त्यांनी सांगितले.
पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून यात्रेतील व्यवहारांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. दरम्यान, व्यावसायिकांमध्ये या घटनेमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
–
यापूर्वी उंबरठाण बाजारात नकली नोटा प्रकार घडला होता. यामधील आरोपींना पोलिसांनी शोध घेत ताब्यात घेण्यात यश आले होते.



