राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या कु. भूमिका खोटरे यांचा देवलदरी शाळेकडून सत्कार
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या कु. भूमिका खोटरे यांचा देवलदरी शाळेकडून सत्कार
सुरगाणा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवलदरी येथे राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट खो-खो खेळाडू तथा सुवर्णपदक विजेत्या कु. भूमिका बाबुराव खोटरे हिचा शाळेच्या वतीने गौरवपूर्वक सत्कार करण्यात आला.
कु. भूमिकाने नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. तिच्या या यशामुळे देवलदरी गावासह संपूर्ण तालुक्याचे नाव उज्ज्वल झाले आहे. तिच्या या कर्तृत्वाबद्दल शाळेतील शिक्षकवर्ग, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांमध्ये अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन तिचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित मान्यवरांनी तिच्या मेहनतीचे व चिकाटीचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कु. भूमिकाने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांचे मार्गदर्शन, प्रशिक्षकांचे सहकार्य आणि शाळेच्या पाठबळाला दिले. तिच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविण्याची प्रेरणा मिळाली आहे.
कार्यक्रमास शिक्षकवृंद, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन शाळेच्या शिक्षकांनी केले.


