
चणकापूर धरणात पोहताना युवक बेपत्ता; शोधमोहीम सुरू
कळवण तालुक्यातील चणकापूर धरण परिसरात रविवारी फिरण्यासाठी आलेल्या एका युवकाचा पाण्यात पोहताना बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. धनंजय नितीन महाले (वय १८, रा. संभाजीनगर, कळवण) असे बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव असून अभोणा पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय महाले हा मित्रांसोबत चणकापूर धरण परिसरात फिरण्यासाठी आला होता. दरम्यान, तो धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरला असता अचानक खोल पाण्यात गेला आणि बेपत्ता झाला. दुपारी सुमारे ३ वाजेपासून स्थानिक युवकांकडून त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र सायंकाळी ७ वाजेपर्यंत त्याचा कोणताही मागमूस लागला नाही. त्यानंतर रेस्क्यू टीमच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे चणकापूर धरण व सापुतारा परिसरात पर्यटकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे धरण परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जलसंपदा विभागाने प्रतिबंधित क्षेत्र निश्चित करून तेथे चौकीदारांची नियुक्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या रेती तस्करीमुळे पाण्याखाली खोल खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे पाण्याची खोली लक्षात न आल्याने अशा दुर्घटनांचा धोका वाढत असल्याचे सांगितले जात आहे.
तसेच धरण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, लाइफगार्ड आणि इशारा फलकांची व्यवस्था करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. चणकापूर धरणाच्या उत्तर दिशेला असलेल्या गंगापूर गावाच्या बाजूने पर्यटक थेट दुचाकी व चारचाकी वाहनांनी धरण परिसरात पोहोचत असल्याने सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

