रस्त्यांची लागली ‘वाट’ — सुरगाण्यात मार्गक्रमण बिकट वाहनचालक आणि प्रवाशांचे हाल; विकासाची गाडी थांबली कुठे?
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

सुरगाणा तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून ठिकठिकाणी खोल खड्डे पडल्याने वाहनचालक आणि प्रवाशी यांचे हाल होत आहेत. काही ठिकाणी रस्त्याचा अक्षरशः वाट लागल्याचे चित्र दिसत आहे.
तालुक्यातील अंतर्गत भागांना जोडणाऱ्या प्रमुख मार्गांवर साईटपट्ट्यांची दुरवस्था, डांबरीकरणाचा थर उखडणे, तसेच पावसामुळे निर्माण झालेले खड्डे यामुळे वाहनचालकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. एखादी रुग्णवाहिका या रस्त्यावरून जात असली, तर रुग्ण सुरक्षित रुग्णालयात पोहोचविणे हे चालकासाठी दिव्य ठरत आहे.
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आदिवासी भागातील नागरिकांना चांगल्या रस्त्याचे स्वप्न साकार झालेले नाही. विकासाचा मार्ग रस्त्यांपासूनच जातो, असे म्हटले जाते; पण सुरगाण्यात मात्र विकास आणि रस्ते हे दोन शब्द कोसो दूर गेल्याचे वास्तव नागरिकांना जाणवत आहे.
रस्त्यांच्या या बिकट परिस्थितीमुळे प्रवासी, शालेय विद्यार्थी, रुग्ण तसेच शेतकरी वर्ग सर्वांनाच प्रचंड गैरसोय सहन करावी लागत आहे. संबंधित विभागाने तत्काळ दुरुस्तीची कामे हाती घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी तालुक्यातील ग्रामस्थांकडून होत आे.


