संत निवृत्तिनाथ यात्रेनिमित्त दुमदुमली शेपुझरी पार नदीकाठी लाखो भक्तांची मांदियाळी

संत निवृत्तिनाथ यात्रेनिमित्त दुमदुमली शेपुझरी
पार नदीकाठी लाखो भक्तांची मांदियाळी
षटतिला एकादशी निमित्ताने शेपुझरी येथे संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. जिल्ह्यातील पेठ – सुरगाणा तालुक्याच्या सरहद्दीवरील पार नदी काठावरील शेपुझरी येथे मोठी यात्रा भरली होती. यात्रेत पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण तालुक्यासह डांग, धरमपूर, कपराडा, सुतारपाडा भागातील भाविक दर्शनासाठी आले होते.
टाळमृदंगाच्या गजरात शेपुझरीचा परिसर दुमदुमला होता. शेपुझरीच्या घनदाट जंगलाच्या सानिध्यात भगवान शंकराचे पुरातन मंदिर आहे. बाराही महिने वाहणारा जीवंत झरा या ठिकाणी आहे. यासह संत मंदाकिनी महाराजांचे मंदिर आहे. सुरगाणा तालुक्यातील कहांडोळपाडा शिवारात नदीच्या कडेस संत निवृत्तिनाथांचे मंदिर आहे. दोन दिवसांपासून दिंडी घेऊन वारकऱ्यांसह भाविकांची गर्दी होती. गळ्यात तुळशीमाळ, डोक्यावर तुलसीवृंदावन, हाती टाळ मृदंग, भगव्या पताका घेतलेल्या हजारो वारकऱ्यांनी शेपुझरीनगरी गजबजली होती. भाविकांच्या खासगी वाहनांना आतमध्ये वाहने नेण्यास मनाई करण्यात आली होती. कहांडोळपाडा परिसरात तीन ठिकाणी खासगी पार्किंगची सोय केली होती. पेठ तालुक्यातून येणाऱ्या वाहनांसाठी चौकडा येथे वाहनतळ उभारण्यात आला होता. यात्रेत प्रसाद, खेळणी, खाऊच्या दुकानांसह गरजेच्या वस्तूंची दुकाने थाटण्यात आली होती. यात्रेसाठी बाऱ्हे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बाऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. अपेक्षा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्य अधिकारी मनीष गाडगीळ, आरोग्यसेवक पवन भांगे, आरोग्यसेविका शीतल गवळी यांनी आरोग्य सेवा केली.



