
भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; चालक फरार
चिकाडी–घाटाळबारी रस्त्यावर घाटाळबारी फाट्याच्या पुढे झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. विजयभाई सुकरभाई जाधव (वय ३६, रा. वाघवळ, ता. धरमपूर, जि. वलसाड, गुजरात) असे मृताचे नाव आहे.
विजयभाई हे चिकाडी येथून घाटाळबारीकडे जात असताना समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात वाहन चालवत जोरदार धडक दिली. या अपघातात विजयभाई यांच्या डोक्यास, उजव्या हातास व खांद्यास गंभीर दुखापत झाली. तसेच दुचाकीवरील अक्षय याच्या डोक्याच्या उजव्या बाजूस कपाळावर मार लागला. अपघातात हिरो होंडा कंपनीची दुचाकी (क्र. GJ-15 AG-3914) चेही मोठे नुकसान झाले.
अपघातानंतर संबंधित वाहनचालक कोणतीही खबर न देता घटनास्थळावरून पळून गेला. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास ASI एस. गांगोडे करीत आहेत.



