बोरगाव विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात
बोरगाव विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात
सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथील धैर्यशील राव पवार विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवित पाहुण्यांचे स्वागत केले. ईश्वर स्तवन व स्वागतगीताने कार्यक्रमास मंगलमय सुरुवात झाली. त्यानंतर ज्ञानदेवता सरस्वती माता, स्वामी विवेकानंद व आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय वाघ होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रघुनाथ भोये तर उपाध्यक्ष लक्ष्मण बागुल उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सादरीकरणांमधून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत अभ्यासात सातत्य ठेवून प्रगती साधावी, तसेच मुलींचे लग्न १८ व मुलांचे २१ वर्ष पूर्ण झाल्याशिवाय करू नये असा सामाजिक संदेश दिला.
कार्यक्रमात भारतीय दंड संहितेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेले कायदे, महिला सुरक्षा विषयक कायदे, पॉक्सो कायदा, बालविवाह प्रतिबंध, वाढती व्यसनाधीनता, वाहतूक सुरक्षिततेचे नवीन नियम, मोबाईलच्या अतीवापराचे दुष्परिणाम व सायबर गुन्हेगारी याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. इयत्ता ५वी ते १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषांमध्ये वैयक्तिक नृत्य, समूहनृत्य, आदिवासी नृत्य, डांगी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
प्राचार्य संजय वाघ यांनी प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केदु चव्हाण व कविता आहेर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.



